

Marathi Story Writing and Literary Mentorship
esakal
डॉ. हेमंत बा. अय्या
मंदार भावे सांगतात तशी कथा लिहिल्यास ती अगदी बेढब आणि पचपचीत वाटेल, अशी तिला भीती होती आणि मंदार सर परिपक्व कथेचा वारसा पुढे नेऊ पाहणाऱ्या अनुयायाच्या शोधात होते. अभिव्यक्तीच्या कौशल्याच्या ज्या उभारीपर्यंत अनुभवणं आणि घडवणं शक्य झालंय, त्या अनुभूतीपर्यंत एखादा तरी यावा, या प्रयत्नात होते. भावे सरांनी नेहाला कथेत अजून काही दुरुस्त्या सुचविल्या आणि दोन दिवसांनी कथा पुन्हा दाखवण्यासंबंधी सूचना केली.
‘‘एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव, नेहा. तुझ्या क्राफ्टला तुला अजून इम्प्रूव्ह करायचंय. धिस इज जस्ट द बिगिनिंग! तू लिहीत असलेली कथा ही केवळ तुझी कथा नाहीये. ही तुझ्याबरोबरील अनेकांची आणि तुझ्या भोवतालच्या समग्रतेची कथा आहे. सो इट्स अ नेव्हर एंडिंग क्राफ्ट. बट आय हॅव टू से, यू आर गेटिंग द क्राफ्ट!’’ भावे सरांनी केलेल्या कौतुकानं नेहा खूश झालीच, पण सर आपल्या कथेबद्दल नेमकं काय सांगत आहेत, याची जाण येण्याइतपत नेहा आणि तिची कथाही अद्याप पक्व नव्हती. तरीही नेहाचं कुतूहल तिला स्वस्थ बसू देईनाच...!
‘‘भावे सर, एक प्रश्न होता. विचारू का?’’ भावे सर ओठातच हसले. त्यांना नेहाचा प्रश्न माहीत होता. तरीही कन्फर्मेशनसाठी त्यांनी नेहाला डोळ्यांनीच होकार दिला.
‘‘सर, माझी हीच कथा आपण जरा दुरुस्त करून पाठवू शकतो का आकाशदिवा कथा स्पर्धेला?’’ अपेक्षित प्रश्नाचं आणि कथेच्या क्षेत्रात नुकतेच पाऊल टाकलेल्या या युवा कथाकाराला काय उत्तर द्यावं, या विचारात भावे सर बुडाले. त्यांना पुढे काय बोलावं सुचेना. तरीही नेहा उत्तराची वाट पाहत आहे, हे लक्षात आल्यानंतर ते गडबडीनं म्हणाले, ‘‘मी सुचवलेल्या दुरुस्त्या बारकाव्यानं कर कथेत! नंतर कथा कशी काय वाटतेय, तिचा परिणाम कसा होता, हे आपण अजून खोलवर जाऊन पाहू!’’ भावे सरांच्या या उत्तरानं काही नेहाचं समाधान झालं नव्हतं. तरीही सरांकडून अपेक्षित उत्तर काही मिळणार नाही, हे लक्षात आल्यानंतर, ‘‘हो सर. मला आत्ता तास आहे. मी निघते,’’ म्हणून तिनंही स्टाफरूममधून पाय मागे घेतले. तिला कथेचा दुरुस्त करून दिलेला कागद घेऊन बाहेर जाताना पाहताच भावे सरांना दोन महिन्यांमागची ती दुपार आठवली...
शिपाई स्टाफरूमच्या दारात उभा राहून नव्यानंच भाषा विभागात रुजू झालेल्या भावे सरांना शोधत होता. त्यानं पाठमोऱ्या असलेल्या भावे सरांना हाक दिली. ‘‘भावे सर, प्रिन्सिपल सरांनी तुम्हाला बोलावलंय. मी दोनदा आलो. तुमी वर्गात होतात. तसं त्यांना कळवलंयपण.’’ एवढं सांगून शिपाई निघून गेला. सकाळपासून लागोपाठ चार तास आणि आत्ता आलेलं हे आमंत्रण... मंदार भावे सरांना जरा वैताग वाटलाच. पण हा शिपाई आत्ताच जाऊन प्राचार्य राऊतांना ‘भावेंना निरोप दिलाय’ हे सांगून मोकळा होईल, हे त्यांनी जाणलंच. त्यांनी हातातलं काम तसंच ठेवून स्टाफरूम सोडली आणि ते कॉरिडॉरमधून चालू लागले.