

Parenting tips for modern families
esakal
मेघा नडे-नगरे
खरंतर प्रत्येक मुलात एक खास गुण दडलेला असतो. फक्त तो ओळखण्याची आणि वाढवण्याची गरज असते. जेव्हा आपण मुलांना त्यांच्या गतीनं वाढू देतो, त्यांना समजून घेतो, त्यांचं कौतुक करतो, तेव्हा ती फुलासारखी उमलतात. पण सतत तुलना केली, तर तेच फूल उमलण्याआधीच कोमेजून जातं. जेव्हा आपण त्यांच्यावर विश्वास ठेवतो, तेव्हा ती स्वतःवर विश्वास ठेवायला शिकतात.
संध्याकाळचे सात वाजलेले. आई अजून ऑफिसमधून आलेली नाही, बाबा फोनवर व्यग्र... खोलीत एकटाच असलेला मुलगा पुस्तक उघडून बसलाय, पण त्याचं लक्ष अक्षरांवर नाही. त्याला फक्त एकच हवं आहे - कुणीतरी विचारावं, ‘आजचा दिवस कसा गेला?’
आजच्या शहरी जीवनात हे दृश्य खूप सामान्य झालं आहे. आई-बाबा दोघेही कामात व्यग्र; घर चालवण्यासाठी, मुलांच्या भविष्याकरता दिवस-रात्र मेहनत करत असतात. पण या धावपळीत त्यांचं मुलांशी असलेलं भावनिक नातं नकळत मागं पडतं. किशोरवय हा नाजूक टप्पा असतो. मुलं मोठी होत असतात, स्वतःची ओळख शोधत असतात, बाहेरच्या जगाशी झुंज देत असतात. त्यांना स्वातंत्र्य हवं असतं, पण त्याच वेळी आई-बाबांच्या आधाराचीही खूप गरज असते. ते कदाचित शब्दांत सांगत नाहीत, पण त्यांच्या मनात तशी अपेक्षा असते.