डॉ. राजेंद्र नेवसे
वैद्यकीय पर्यटनातील अदृश्य नायक कोण असेल तर तो दुभाषी! तो डॉक्टर आणि रुग्ण यांच्यातील संवादाचा सेतू असतो. तो परस्परांमध्ये विश्वास निर्माण करतो, रुग्णाचा आत्मविश्वास वाढवतो. त्यामुळे वैद्यकीय पर्यटनातील दुभाष्याची भूमिका ‘या हृदयीचे त्या हृदयी’ घालणाऱ्याचीच असते...
मेंदूचा कर्करोग झालेली अफगाण तरुणी. तेथील एका बड्या घराण्यातील मुलगी. तिला दीर्घायुष्य लाभावे यासाठी कुटुंबातील लोक जगभरातील तज्ज्ञ डॉक्टरांचे सल्ले घेत होते.
सगळीकडे विचारपूस, चौकशी, पडताळणी करून हैदराबाद येथील एका रुग्णालयात मेंदूच्या कर्करोगाची शस्त्रक्रिया करून पुढील उपचार येथेच घेण्याचा निर्णय झाला. त्याप्रमाणे कागदपत्रे, रिपोर्ट्््स असे सगळे सोपस्कार करून रुग्ण मुलगी अफगाणिस्तानातून हैदराबाद विमानतळावर उतरली.
या मुलीला आणि तिच्याबरोबर आलेल्या नातेवाइकांना फक्त पश्तो भाषा येत होती. विमानतळातून बाहेर पडून हॉस्पिटलमध्ये ते पोहोचले खरे, पण त्यानंतर तेथे अॅडमिशन डेस्कपासून ते डॉक्टरांपर्यंत भाषेचा अडसर जाणवत होता.
डॉक्टर, रुग्णालयाशी संबंधित इतर लोक काय सांगत होते ते काही केल्या त्या अफगाणी कुटुंबाला समजत नव्हते. अखेर, हॉस्पिटलनेच त्यांना मोलाची मदत केली. त्यांना पश्तो भाषा जाणणारा दुभाषी जोडून दिला. त्याने आपलेपणाने रुग्ण आणि डॉक्टर यांच्यातला संवाद सुकर केला.