

Mental health awareness films
esakal
जेव्हा तुम्ही एखादा चित्रपट पाहता, तेव्हा तुम्ही नकळतपणे काही माहितीदेखील आत्मसात करत असता. आणि जर ती माहिती शास्त्रीयदृष्ट्या अचूक असेल, तर ती तुमच्या ज्ञानात भर घालते. त्यामुळे तुम्ही कोणते चित्रपट पाहता यावर ते चित्रपट शिकण्याचे एक महत्त्वाचे साधन आहे की नाही हे अवलंबून असते. हे अगदी पुस्तकांसारखेच आहे, तुम्ही योग्य पुस्तकांची निवड केलीत तरच तुम्ही त्यांतून शिकू शकता.
निरोगी आयुष्य हा जीवनाचा अविभाज्य भाग आहे. तुम्ही निरोगी नसाल, तर तुम्ही जीवनाचा आनंद घेऊ शकत नाही. आणि निरोगी असणे शारीरिक आरोग्याइतकेच मानसिक आरोग्याशीही निगडित असते. अशी कोणतीही आरोग्यविषयक समस्या नाही, जिला मानसिक पैलू नसतात. किंबहुना, मानसिक आरोग्यापेक्षा श्रेष्ठ असे कोणतेही आरोग्य नाही. कारण जर तुम्ही मानसिकदृष्ट्या सक्षम आणि तंदुरुस्त असाल, तर तुम्ही आयुष्याचा पूर्ण आनंद आणि जीवनाचा परिपूर्ण अनुभव घेऊ शकता, अगदी शारीरिकदृष्ट्या विकलांग असलात तरीही. आजसुद्धा काही मानसिक आजारांना बराच कलंक (Stigma) जोडलेला आहे, हे आपण नाकारू शकत नाही. लोकांच्या वर्तणुकीतून तो उघड उघड दिसत नसेलही, पण तो दडलेला असतो. खासगीत आपण अजूनही अशा विषयांवर बोलणे किंवा त्या समजून घेणे टाळतो. पूर्वी एकूणच मानसिक आजारांविषयी कलंक होता, आपण मानसिक आजारांचे अस्तित्व मान्य करत नव्हतो, कारण त्याबाबतीत अज्ञान होते. पण आता आपण अज्ञानी नाही, तरीही आपण मानसिक आजार स्वीकारत नाही. एखाद्या छोट्या गोष्टीमुळे तुम्हाला जगण्याचा आनंद घेता येतो का नाही यावर ती गोष्ट ‘आजार’ आहे की नाही हे ठरते; पण ज्या सहजतेने आपण सर्दी किंवा खोकला स्वीकारतो, त्याच सहजतेने सौम्य चिंता किंवा उदासीनता मानसिक आजार म्हणून आपण स्वीकारत नाही. ते गंभीर होण्याची आपण वाट बघतो. कलंक कमी करण्यास आणि गैरसमज दूर करण्यास मदत करतील, अशा विषयांवर मनोरंजन करता करता शास्त्रीय माहिती देणारे चित्रपट करणे खरोखरच कठीण असते. याबाबतीत लोकांना जागरूक करण्यासाठी मला जेव्हा सिनेमा या माध्यमाची उपयुक्तता लक्षात आली, तेव्हापासून मी असे चित्रपट करण्याच्या प्रयत्नात असतो. अशा विषयांवरचे सिनेमे हे एक चांगला माणूस घडण्यासाठीचे उत्तम दृक्श्राव्य माध्यम ठरू शकते. दर्जेदार आणि उत्तम मनोरंजनाच्या जोडीने जनजागृती निर्माण करणे आणि मानसिक आरोग्याबद्दल नकळत शिक्षण देणे हे माझे ध्येय आहे. याच ध्येयपूर्तीसाठी मी ‘डेव्हलपिंग अवेअरनेस थ्रू एंटरटेन्मेंट - डेट (DATE)’ या उपक्रमाला सुरुवात केली. यामार्फत सिनेमा आणि नाटक या प्रभावी माध्यमांचा वापर करून नुसत्याच एंटरटेन्मेंटवर भर न देता ‘क्वालिटी एंटरटेन्मेंटवर’ भर देण्याचा प्रयत्न असतो.