diabetes treatment
Esakal
डॉ. शशांक शहा
भारतात टाइप २ मधुमेह रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असून पारंपरिक उपचार नेहमीच प्रभावी ठरत नाहीत. मेटाबॉलिक सर्जरीमुळे मधुमेह नियंत्रणाचा नवा मार्ग खुला झाला आहे. ही शस्त्रक्रिया इन्सुलिन रेझिस्टन्स कमी करते, रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित करते आणि योग्य उपचारांनी रुग्ण मधुमेहमुक्त जीवन जगू शकतो...
“मी माझ्या वाढदिवशी वजन काट्यावर उभी राहिले होते. चाळिसाव्या वाढदिवशी वजनाचा काटा शंभरवर होता. वयाबरोबर वजन बेसुमार वेगाने वाढत होते. त्यासोबत वाढत होते शरीरातील साखरेचे प्रमाण. व्यायाम, डाएट करूनही फारसा परिणाम होत नव्हता. अखेर पुढच्या वाढदिवसापर्यंत वजन कमी करण्याचा पण केला. त्यातून मेटॅबॉलिक सर्जरीचा पर्याय पुढे आला. ही सर्जरी केली. तीन महिन्यांमध्ये वजन कमी झाले.
आता शस्त्रक्रियेला चार वर्षे झाली. वजनाचा काटा ५५च्या पुढे जाणार नाही, याची मी रोज काटेकोर काळजी घेते. त्यामुळे रक्तातील साखर अनियंत्रित असायची, ती आता नियंत्रित झाली. इतर औषधेही पूर्ण बंद झाली...’’ जागृती बोलत होत्या... बोलताना त्यांच्या शब्दांतून जाणवणारा आनंद पटकन लक्षात येत होता. ‘‘मधुमेहमुक्त जीवन जगण्यासाठी काही रुग्णांना ही शस्त्रक्रिया वरदान ठरते. तशी ती मला ठरली,‘‘ अशा शब्दांत त्यांनी समाधान व्यक्त केले. पण काय आहे ही मेटॅबॉलिक सर्जरी?
भारतातील आरोग्यविषयक आकडेवारीकडे पाहिल्यास, टाइप २ मधुमेह हा सर्वाधिक वेगाने वाढणाऱ्या आजारांपैकी एक ठरतो. आधुनिक जीवनशैली, वाढता ताण, चुकीच्या आहाराच्या सवयी आणि शारीरिक हालचालींचा अभाव यांमुळे तरुण वयातही मधुमेहाचे प्रमाण वाढले आहे. तरीसुद्धा, हा आजार प्रामुख्याने वयाच्या तिशीनंतर अधिक प्रमाणात आढळतो आणि लठ्ठपणाशी त्याचा जवळचा संबंध मानला जातो.
पूर्वी असा समज होता की मधुमेह एकदा झाला, की तो आयुष्यभराचा साथीदार ठरतो; औषधे, इन्सुलिन आणि जीवनशैलीतील बदल यांच्या साहाय्याने तो फक्त नियंत्रणात ठेवता येतो, पण पूर्णपणे बरा होऊ शकत नाही. मात्र, मागील दोन दशकांत वैद्यकीय संशोधनात झालेल्या क्रांतिकारी प्रगतीमुळे हा दृष्टिकोन बदलला आहे. मेटॅबॉलिक सर्जरी नावाच्या विशेष शस्त्रक्रियेने मधुमेहाचे व्यवस्थापन नव्या पातळीवर नेले आहे. या शस्त्रक्रियेच्या साहाय्याने रक्तातील साखरेवर अधिक प्रभावी नियंत्रण मिळते, औषधांवरील अवलंबित्व कमी होते आणि अनेक रुग्णांमध्ये मधुमेह जवळजवळ पूर्णपणे नष्ट होतो.