Millet Food: बाजरीची बिस्किटे, बाजरीचा हलवा, झुणका-भाकरीचा थेट परदेशप्रवास..!!

millet food
millet foodesakal

रागी कुकीज, बाजरी बिस्किटे, ज्वारी नमकीन, बाजरीचा हलवा, उपमा, झुणका -भाकरी, ज्वारी-बाजरी-नाचणी-वरी यांचे पोहे, चिवडा यांसारखे पदार्थ हे भरडधान्याचे काही लोकप्रिय पदार्थ आहेत. आज आमची उत्पादने अमेरिका, दुबई, सिंगापूर, कॅनडा, नेदरलँड्स, बेल्जियम आदी देशांमध्ये मिळतात. महाराष्ट्राच्या राज्यपालांकडून गेल्या वर्षी राज्यस्तरीय प्रथम पुरस्कारासह मिळालेल्या अनेक पुरस्कारांच्या रुपाने आमच्या प्रयत्नांचे कौतुकही झाले आहे.

तात्यासाहेब फडतरे

कोरोनाच्या महासाथीनंतरच्या काळात ‘प्रतिकारशक्तीयुक्त’ पदार्थांची चर्चा वाढली आहे. या संदर्भाने आपल्या पारंपरिक अन्न प्रणालींचे पुनरुज्जीवन करण्यासाठी आणि निसर्गाशी पर्यावरणीय सुसंवाद राखण्यासाठी पोषक भरडधान्य हा योग्य पर्याय आहे.

अनेक ऐतिहासिक पुराव्यांनुसार सिंधू संस्कृतीच्या काळात वापरल्या गेलेल्या धान्यांमध्ये ज्वारी, बाजरी, नाचणी ही तृणधान्ये म्हणजे भारतात सर्वप्रथम स्वीकृत केले गेलेली पहिली पिके होती. सध्या बहुतांश देशांमध्ये ही तृणधान्ये –भरडधान्ये -पिकवली जात असल्याने आशिया आणि आफ्रिकेतील अर्ध्या अब्जाहून अधिक लोकांसाठी भरडधान्ये ही पारंपरिक अन्न मानली जातात.

भारतात, भरडधान्य किंवा श्री अन्न ही प्रामुख्याने खरीप पीके आहेत, या पिकांना इतर मुख्य पिकांपेक्षा कमी पाणी आणि कृषी निविष्ठांची आवश्यकता असते. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी आणि जगभरातील अन्न आणि पोषण सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी भरडधान्य महत्त्वपूर्ण आहे.

भरडधान्याची प्रचंड पोषण क्षमता ओळखून संयुक्त राष्ट्रांनी भरडधान्ये शाश्वत विकास उद्दिष्टांशीदेखील जोडली आहेत. भारत सरकारनेही भरडधान्याला प्राधान्य दिले आहे.

तृणधान्यांचे महत्त्व ओळखून लोकांना या धान्यांपासून तयार केलेले पोषक खाद्य पदार्थ उपलब्ध करून देण्यासाठी तसेच देशांतर्गत आणि परदेशी बाजारातील मागणी वाढेल यादृष्टीने प्रयत्न करण्यासाठी २०२३ हे वर्ष आंतरराष्ट्रीय भरडधान्य वर्ष म्हणून घोषित करण्याच्या बाबतीत संयुक्त राष्ट्र महासभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकाराने भारत सरकारने अत्यंत महत्त्वाची भूमिका निभावली.

पंतप्रधानांनी मांडलेल्या ‘वसुधैव कुटुंबकम्’ या व्हिजनसह आंतरराष्ट्रीय भरडधान्य वर्ष २०२३ उत्सव ही भारतासाठी संधी आहे.

उच्च पोषण मूल्य, लहान आणि सीमांत शेतकऱ्यांच्या आर्थिक सक्षमीकरणाची क्षमता आणि पृथ्वीची जैवविविधता राखण्यातील भरडधान्यांचे योगदान लक्षात घेऊन महाराष्ट्र राज्याने स्वतःचा महाराष्ट्र भरडधान्य मिशन राबविण्याचा निर्णय घेतलेला आहे. यात कृषी, पणन, ग्रामविकास व महिला व बालकल्याण विभागाची प्रमुख भूमिका राहणार आहे.

कोविड-१९च्या महासाथीने आपल्या सर्वांना आरोग्य आणि रोग प्रतिकारक पोषणाचे महत्त्व पटवून दिले आहे. अशा वेळी तृणधान्य म्हणजेच पोषक धान्याशी संबंधित जागतिक चळवळ हे एक महत्त्वाचे पाऊल आहे.

तृणधान्य सहज पिकवता येत असल्याने, ते हवामान सुसंगत आणि दुष्काळ परिस्थितीतही अनुकूल असल्याने तृणधान्यांना भविष्यातील अन्नपर्याय बनवणे, ही काळाची गरज आहे. ही नामी संधी जशी शेतकऱ्यांना आहे तशी ती संधी शहरातील ग्राहकांनाही आहे. महिलांसाठीही एक विश्वसनीय व्यवसाय सुरू करण्यासाठी उत्तोत्तम वेळ आली आहे, असेच म्हणावे लागेल.

भरडधान्यापासून शुद्ध स्वरूपात ग्लुकोजसह खनिजे जीवनसत्त्वे आणि अँटिऑक्सिडंट मिळतात. शरीरात रोग प्रतिकारकशक्ती निर्माण करणारी म्हणून भरडधान्याला आता श्री अन्न संबोधले जाते. त्या धान्यांचा समावेश आहार साखळीमध्ये करणे आवश्यक आहे. ज्वारी, बाजरी, नाचणी ही राज्यातील प्रमुख तृणधान्ये आहेत.

तर राळा, कुटकी, कोडो किंवा कोद्रा, सावा, वरी आणि राजगिरा ही कमी प्रमाणात उत्पादित होणारी तृणधान्ये आहेत. या धान्यांची मागणी वाढावी, यासाठी प्रयत्न केले जात आहेत. या तृणधान्यांना विविध माध्यमातून बाजारपेठ उपलब्ध करून देण्यात येत आहे.

भविष्यातील खाद्यपदार्थ

ग्रामीण बाजारपेठांमध्ये वैविध्य आणत गेल्या काही वर्षांपासून, ज्वारी, बाजरी, नाचणी यांसारख्या तृणधान्यांच्या पदार्थांनी बाजारपेठेत प्रवेश मिळवला आहे. आज प्रत्येकाच्या घरामध्ये बेकरी उत्पादने असतात. त्याच उत्पादनांमध्ये गहू, मैदा न वापरता तृणधान्ये वापरली तर रोजच्या अन्नात पौष्टिक घटकांचा समावेश होईल.

रागी कुकीज, बाजरी बिस्किटे, ज्वारी नमकीन, बाजरीचा हलवा, उपमा, झुणका -भाकरी, ज्वारी-बाजरी-नाचणी-वरी यांचे पोहे, चिवडा यांसारखे पदार्थ हे भरडधान्याचे काही लोकप्रिय पदार्थ आहेत. क्विनोआ हे एक प्रमुख उदाहरण आहे ज्याने शहरी आहारात वर्चस्व वाढवले आहे.

‘व्होकल फॉर लोकल’ सारख्या मोहिमेअंतर्गत देशी पिकांना अधिक समर्थन देऊन त्यांच्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. याचा पाठपुरावा करण्याचा एक शाश्वत मार्ग म्हणजे शहरातील महिला बचत गटांना प्रगत पॅकेजिंग तंत्र, कृषी विपणन, आर्थिक साक्षरता आणि इतर उद्योजकीय कौशल्यांसह सुसज्ज करणे. असे केल्यास खूप मोठी प्रगती होऊ शकते.

शहरातील अंगणवाडी आणि आशा कार्यकर्त्यांसारख्या तळागाळातील कामगारांना पोषण दूत आणि उद्योजक म्हणून भरडधान्य क्रांतीमध्ये सहभागी करून घेतल्यास त्याचा फायदा होईल.

कोरोनाच्या महासाथीनंतरच्या काळात ‘प्रतिकारशक्तीयुक्त’ पदार्थांची चर्चा वाढली आहे. या संदर्भाने आपल्या पारंपरिक अन्न प्रणालींचे पुनरुज्जीवन करण्यासाठी आणि निसर्गाशी पर्यावरणीय सुसंवाद राखण्यासाठी पोषक भरडधान्य हा योग्य पर्याय आहे. योग्य किमतीमध्ये आज ही धान्ये बाजारात उपलब्धही आहेत.

असेच वेगळे प्रयोग करत आम्ही भरडधान्याचे विविध प्रकारचे पदार्थ तयार करून ते देशातच नाही तर परदेशातही पोहोचविले आहेत.

या प्रयोगाकडे जाण्यापूर्वी थोडं माझ्या प्रवासाविषयी..

आम्ही फडतरे पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील वडापुरीचे. नवनाथांपैकी एक असलेल्या गोरक्षनाथांची कथा आमच्या वडापुरीची आहे. आमचे कुटुंब धार्मिक - वारकरी संप्रदायाचे. माझ्या लहानपणी आमची आर्थिक परिस्थिती बिकट होती.

आम्ही आठ भावंडे म्हणजे सहा बहिणी आणि दोघे भाऊ. आम्ही शेतात रोजंदारीवर शेतीची कामे करायचो. दहावीमध्ये मला पंचाहत्तर टक्के मार्क मिळाले. एवढे मार्क बघून वडिलांना वाटायचं की मी डॉक्टर व्हावं, पण माझ्या डोक्यात एक वेगळंच चक्र चालू होतं, आयटीआय करून लवकरात लवकर नोकरी मिळणं महत्त्वाचं आहे, त्यामुळे हात-तोंडाची बैठक होईल, असं मला वाटत होतं.

वडिलांच्या आग्रहामुळे सायन्सला प्रवेश घेतल्यानंतर खूप अभ्यास केला. या मेहनतीमुळे बारावीला ७९ टक्के गुण मिळाले. बेळगावच्या आयुर्वेदिक कॉलेजमध्ये प्रवेश मिळत होता, पण पैशाच्या कमतरतेमुळे ते राहिलं.

माझे चुलत भाऊ अरुण फडतरे कृषी अधिकारी होते, त्यांनी मला अॅग्रीकल्चरला फॉर्म भरायला लावला आणि पुण्याच्या कृषी महाविद्यालयात मला प्रवेश मिळाला. फी होती फक्त साडेतीन हजार रुपये आणि मला पाच हजार आठशे रुपये मेरिट स्कॉलरशिप होती.

त्यामुळे कधी घरून पैसे आणावे लागले नाहीत. दोन वर्षे कॉलेजच्या मेसमध्ये जेवण वाढण्याचे काम करायचो, त्यामुळे मेसचे बिल वाचायचे. तिसऱ्या वर्षात असताना पुण्यातल्या एका लॉजमध्ये रात्रपाळी करायचो. सन २०००मध्ये ग्रॅज्युएशन पूर्ण केले आणि लगेचच जोडीदारासोबत नर्सरी सुरू केली, लँडस्केपिंगचे काम सुरू केले.

त्यानंतर ठाणे जिल्ह्यातील एका कृषी शाळेत कृषी अधिकारी म्हणून संधी मिळाली, तिथेच ‘प्रभारी अधीक्षक’ म्हणून बढतीही मिळाली. नंतर २००६पासून दोन वर्षे हैदराबादमधल्या एका कृषी मासिकात उपसंपादक म्हणून काम केले. पुण्यात राहण्याची इच्छा असल्याने राजीनामा दिला आणि २०१२पर्यंत पुण्यातल्या एका कृषीविषयक मासिकात काम सुरू केले.

पत्नी सरोजिनीने २००४मध्ये गृहविज्ञान विषयात पदवी पूर्ण केली होती. हैदराबादहून आल्यानंतर पत्नीने पुण्यात पिठाचा व्यवसाय सुरू केला. पत्नीच्या व्यवसायाला पाठिंबा देण्यासााठी आणि भरडधान्य प्रक्रियाक्षेत्रातील संधीसाठी मी ऑगस्ट २०१२मध्ये नोकरी सोडली, आणि कृषी विभागाच्या मदतीने इंदापूर तालुक्यातील रामवाडी येथे भरडधान्य प्रक्रिया युनिट सुरू केले.

चवीशी कोणतीही तडजोड न करता आरोग्यदायी उत्पादनांच्या निर्मितीवर आम्ही भर दिला. ज्वारी, बाजरी, नाचणी अशा कोरडवाहू पिकांना नवी ओळख देताना आम्ही भरडधान्यांवर प्रक्रिया करून सत्तावीसहून अधिक उत्पादनांची यशस्वीपणे विक्री केली. शेतकरी हा आमच्या या उपक्रमाचा कणा आहे.

म्हणूनच बाजरीला बाजारभावाच्या तुलनेत दहा टक्के जास्त मोबदला देऊन आरोग्य, पर्यावरण संतुलन आणि शेतकऱ्यांच्या फायद्याच्या दृष्टीने या उत्पादनांचे महत्त्व शेतकऱ्यांना पटवून देण्यावर सुरुवातीला आमचा भर होता.

आज आमचा भर उत्पादनांपेक्षा संकल्पनांच्या विक्रीवर आहे. त्याला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. प्रदर्शने, ऑनलाइन मार्केटिंग, विविध कंपन्यांशी टायअप, थेट विक्री इत्यादींद्वारे गेल्या दशकभरात उत्पादनांचा आवाका आम्ही वाढवला.

आज आमची उत्पादने अमेरिका, दुबई, सिंगापूर, कॅनडा, नेदरलँड्स, बेल्जियम आदी देशांमध्ये मिळतात. महाराष्ट्राच्या राज्यपालांकडून गेल्या वर्षी राज्यस्तरीय प्रथम पुरस्कारासह मिळालेल्या अनेक पुरस्कारांच्या रुपाने आमच्या प्रयत्नांचे कौतुकही झाले आहे.

शहरी महिलांसाठी संधी

रेडी-टू-इट/ रेडी-टू-कुक या श्रेणीमध्ये भरडधान्य उत्पादने निर्मिती करायची असल्यास शासनाने शेतकरी असण्याची अट रद्द केली आहे. त्याचबरोबर अन्न प्रक्रिया उद्योग सुरू करण्यासाठी सरकार आता ३५ टक्के अनुदान देते.

यामध्ये एक्सट्रुडेड स्नॅक्स, गोड पुरी, नाचणीचे लाडू, पिठे, कुकीज, केक आणि ब्रेड अशी बेकरी उत्पादने, फ्लेक्स, न्यूडल्स, पास्ता (ग्लूटेनफ्री रागी पास्ता, ग्लूटेनफ्री जोवार पास्ता) दलिया, पीठ, उपमा, बिर्याणी असे विविध प्रकार उपलब्ध आहेत.

मायक्रो फूड प्रोसेसिंग एंटरप्रायझेसच्या स्थापनेसाठी / अपग्रेडींगसाठी मदत

नवीन सूक्ष्म अन्न प्रक्रिया उपक्रमांच्या स्थापनेसाठी आणि विद्यमान सूक्ष्म अन्न प्रक्रिया उपक्रमांच्या अपग्रेडींगसाठी साहाय्य केले जाते.

वैयक्तिक संस्था, उद्योजक/ मालकी संस्था/ भागीदारी फर्म/ फार्मर प्रोड्युसर ऑर्गनायझेशन (एफपीओ), स्वयंसेवी संस्था, सहकारी संस्था, सेल्फ हेल्प ग्रुप अशांना हे साहाय्य मिळते. या व्यतिरिक्त या क्षेत्रातील उद्योगांना ३० ते ६० टक्के अनुदान देणाऱ्या अनेक योजना सरकारमार्फत राबवल्या जात आहेत.

कोणताही व्यवसाय सुरू करण्यासाठी भांडवल, कच्चा माल, विक्री व्यवस्था या गोष्टींची आवश्यकता लागते. त्यातील दहा लाख रुपयांपर्यंत भांडवल आता कोणत्याही बँकेमार्फत विनातारण मिळू शकते.

भरडधान्याच्या पदार्थांचा खूप मोठा ग्राहक शहरी भागांमध्ये असल्याने, शहरातील महिलांसाठी रोजगारनिर्मिती होऊ शकते. शेतकऱ्यांनी पिकविलेल्या कच्च्या मालावर प्रक्रिया करून ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याचा एक उत्तम दुवा निर्माण करून आर्थिक विकास साधता येईल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com