

minimalism in indian homes
esakal
तुम्ही ज्या जागेत राहता, काम करता, स्वप्न पाहता, ती जागा तुमची ऊर्जा, तुमच्या भावना आणि तुमच्या जीवनाशी जुळणारी असावी. मिनिमलिझम म्हणजे रिकामं घर नाही, तर संतुलित घर! प्रत्येक घर एक गोष्ट सांगत असतं. मिनिमल डिझाईन त्या कथेमध्ये महत्त्वाची भूमिका बजावतं. जिथं मिनिमलिझम फक्त दिसत नाही तर जाणवतं, ते घर खऱ्या अर्थानं सुंदर घर...
धावपळीचा दिवस संपून घरी गेल्यानंतर मनाला एकप्रकारची शांतता मिळते. कारण ‘घर’ ही केवळ जागा नसते, तर ती भौतिक गरजेबरोबरच भावनिक आधारही असते. त्यामुळेच घर प्रसन्न असावं यासाठी तुम्ही होम डेकॉरही कसं करता हे महत्त्वाचं ठरतं. सध्याच्या होम डेकॉरमधला एक ट्रेंडिंग प्रकार म्हणजे ‘मिनिमलिझम’! घरामध्ये खुबीनं केलं जाणारं मिनिमलिस्टिक होम डेकॉर ही एक कलाच आहे.
मिनिमलिस्ट होम डेकॉरमध्ये स्कॅन्डेनेव्हियन, जपांडी, बोहो, मॉडर्न कंटेम्पररी या सध्या सर्वात लोकप्रिय इंटेरियर डिझाईन थीम्स आहेत. प्रत्येक थीम साधेपणा, नैसर्गिक टेक्स्चर आणि शांत, संतुलित सौंदर्याला महत्त्व देते. मी मिनिमल इंटेरियर्ससाठी याच थीम्सचा वापर करून मोकळ्या, सौंदर्यपूर्ण आणि आधुनिक स्पेसेस तयार करते.
गेल्या दहा वर्षांपासून इंटेरियर डिझायनर म्हणून आम्ही विविध लक्झरी रेसिडेन्शियल आणि कमर्शिअल प्रोजेक्ट्सवर काम केलं आहे, आणि या प्रत्येक प्रोजेक्टनं मला एक गोष्ट शिकवली आहे, ती म्हणजे, खरं सौंदर्य नेमकेपणात लपलेलं असतं. तुम्हाला नेमकं काय हवं आहे, तुमची गरज काय आहे, हे ओळखून डेकॉर करणं गरजेचं असतं.