

Minimalistic living vs traditional hospitality
esakal
विद्या हर्डीकर-सप्रे
नीटनेटकेपणा असला म्हणजे घरात अनावश्यक गोष्टी नसतात असं नाही. त्यामुळं पसारा आवरणं म्हणजे गोष्टी नीटनेटक्या ठेवणं नव्हे. त्या खोक्यात भरून ठेवणंसुद्धा नव्हे. तर गोष्टी कमी करणं आणि त्यासाठी वस्तूतील मनाची गुंतवणूक कमी करणं. आर्ट अॅण्ड सायन्स ऑफ मिनिमलिस्टिक लिव्हिंग अशी पुस्तकं वाचून ती कला उमगेल आणि ते शास्त्र समजेल असं नाही.
मागच्या लेखात मी आमच्या घर विक्री एजंटबद्दल सांगत होते. झालं असं, की आमचं अमेरिकेतलं घर बदलताना ही एजंट म्हणाली, ‘घर विकायचं तर सुटसुटीत आणि चकपक पाहिजे. अगदी जेवढ्यास तेवढं. तेव्हा आता तुमच्या घरातल्या निम्म्या वस्तू कमी करा!’
वस्तू वाढतात. त्या केवळ घराच्या आकाराप्रमाणे फुगत नाहीत, त्या माणसांच्या कारभारामुळेसुद्धा वाढतात. अघळपघळ कारभार म्हणजे माणसांचा गोतावळा अधिक. वस्तू आणि माणसं यांचा पसारा आपण वाढवतो तो असा. माझ्या आठवणीत तरी हाच अनुभव होता. माझं लहानपणीच घर अगदीच दीड खोलीचं. पण आमचा कारभार ऐसपैस. आम्ही घरची माणसं. त्यात पुणे मध्यवर्ती म्हणून पै-पाहुणे सतत असत. लग्नाला येणारे, शिकायला येणारे आणि जाता-येता टपकणारे. घरात सतत चहाचं आधण.