

Modern Fashion and Indian Culture
esakal
‘‘माझ्या मुलींनो, आकाशात उंच भरारी घ्या. जगातील प्रत्येक चांगली गोष्ट शिका. पण एवढंच लक्षात ठेवा झाड कितीही उंच वाढलं, तरी त्याला जगण्यासाठी मुळांची गरज असते. तुमची मुळं म्हणजे तुमचा विवेक, तुमचा आत्मसन्मान आणि तुमचे संस्कार.’’ डायरी वाचताना आर्याच्या डोळ्यांत अश्रू होते; पण त्या अश्रूंमध्ये दुःखापेक्षा कृतज्ञता जास्त होती.
पावसाळ्यातली एक संध्याकाळ होती. बाहेर रिमझिम पाऊस पडत होता. स्वयंपाकघरातून आलेल्या वाफाळत्या चहाचा सुगंध संपूर्ण घरभर दरवळत होता. सुमित्राताई देवासमोर दिवा लावून स्वयंपाकघरात आल्या. तेवढ्यात त्यांच्या मुलीच्या, अनन्याच्या खोलीचा दरवाजा जोरात बंद झाल्याचा आवाज आला.
‘‘अनन्या!’’ सुमित्राताईंनी हाक मारली. पण आतून काहीच उत्तर आलं नाही. सुमित्राताईंना कळून चुकलं होतं, की आज पुन्हा काहीतरी झालं आहे. त्यांनी हळूच दरवाजा ठोठावला.
‘‘येऊ का आत?’’
‘‘ये ना, आई’’ अावाजात नाराजीचा सूर होता.
अनन्या पलंगावर बसली होती. तिच्या डोळ्यांत पाणी होते. बाजूला कॉलेजची बॅग पडली होती.
‘‘काय झालं बाळा?’’ आईनं तिच्या डोक्यावरून हात फिरवत विचारलं.
‘‘आई, तू मला समजूनच घेत नाही.’’
‘‘अगं, आधी सांग तर खरं.’’
‘‘आज कॉलेजमध्ये माझ्या मैत्रिणींनी मला सांगितलं, की मी खूप जुनाट विचार करते. त्या म्हणाल्या, की तू कधीच आमच्यासारखे कपडे घालत नाहीस. मी रिप्ड जीन्स घालू का म्हणून विचारलं, तर बाबा रागावले. तुलाही आवडणार नाही. मग मी काय करू?’’
सुमित्राताई हसल्या, ‘‘म्हणजे आजचा विषय कपड्यांचा आहे तर!’’
‘‘हो! पण फक्त कपड्यांचा नाही. मला हे समजत नाही, की आपण भारतात राहतो म्हणून सगळ्याच गोष्टींवर बंधनं का असावीत?’’
आई काही क्षण शांत राहिली.
‘‘अनन्या, मी तुला एक गोष्ट सांगू का?’’
‘‘आई, तू नेहमी गोष्टीच का सांगतेस?’’
‘‘कारण गोष्टी माणसाला विचार करायला शिकवतात.’’
अनन्या हसली. ‘‘ठीक आहे, सांग...’’
सुमित्राताई बोलू लागल्या, ‘‘एका जंगलात दोन झाडं होती. एक उंच नारळाचं झाड आणि दुसरं विशाल वडाचं झाड. नारळाचं झाड म्हणायचं, ‘मी किती आधुनिक! मी आकाशाला स्पर्श करतो’ आणि वडाचं झाड म्हणायचं, ‘मी जमिनीशी जोडलेलो आहे’. एक दिवशी वादळ आलं, नारळाचं झाड जोरजोरात हलू लागलं. वडाचं झाडही हललं, पण त्याच्या मुळांनी त्याला आधार दिला. वादळानंतर दोन्ही झाडं उभी होती. तेव्हा वडाचं झाड म्हणालं, आकाशाला स्पर्श करायला हरकत नाही, पण मुळांशी नातं तुटता कामा नये.’’
अनन्या काही बोलली नाही. सुमित्राताई पुढे म्हणाल्या, ‘‘बाळा, आधुनिक होण्यात काहीच चुकीचं नाही. पण आधुनिक होणं म्हणजे स्वतःला विसरणं नव्हे.’’
‘‘म्हणजे?’’
‘‘म्हणजे, तू जीन्स घाल, कुर्ती घाल, साडी नेस, तुला जे आवडतील ते कपडे घाल. पण स्वतःला एक प्रश्न विचार - मी हे का घालत आहे?’’
अनन्या विचारात पडली, ‘‘आई, तुला रिप्ड जीन्स का आवडत नाही?’’
‘‘मला ती फॅशन समजत नाही, असं नाही. पण मला एक प्रश्न पडतो, ज्या गोष्टीला आपण लहानपणी ‘फाटलं’ म्हणून शिवायचो, तीच गोष्ट आज फॅशन कशी झाली?’’
‘‘पण आई, फॅशन बदलते ना!’’
‘‘हो बदलते. आमच्या काळात बेलबॉटम पँट्स होत्या. त्याआधी साड्यांची पद्धत वेगळी होती. उद्या कदाचित पुन्हा काहीतरी नवीन येईल. पण फॅशन बदलली म्हणून मूल्यं बदलली पाहिजेत असं नाही!’’
‘‘मूल्यं??’’
‘‘आत्मसन्मान, विवेक आणि समजूतदारपणा...’’
‘‘आई, खरं सांगायचं तर, कधीकधी मला चित्रपटातल्या अभिनेत्रींसारखं व्हावंसं वाटतं.’’
‘‘कोणासारखं?’’ त्यावर उत्तरादाखल तिनं एका प्रसिद्ध अभिनेत्रीचं नाव सांगितलं.
आई हसली, ‘‘ती अभिनेत्री सकाळी उठल्यावर कशी दिसते, तिला किती मेहनत करावी लागते, तिच्यावर किती जबाबदाऱ्या आहेत, हे तुला माहिती आहे का?’’
‘‘नाही.’’
‘‘चित्रपटात दोन तासांत सगळं सुंदरच दिसतं. पण खरं आयुष्य चित्रपटासारखं नसतं.’’
‘‘म्हणजे मी तिची कॉपी करू नये?’’
‘‘कॉपी करायचीच असेल तर तिच्या मेहनतीची कर. तिच्या शिस्तीची कर. तिच्या आत्मविश्वासाची कर. पण स्वतःची ओळख गमावून बसू नको.’’
अनन्या शांतपणे ऐकत होती.
‘‘आई, पण लोक काय म्हणतील हा विचार का करायचा?’’
सुमित्राताईंनी दीर्घ श्वास घेतला, ‘‘बाळा, बोलणं लोकांचं कामच आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेव, लोक काय म्हणतील यापेक्षा, उद्या आरशात पाहिल्यावर तुला स्वतःचा अभिमान वाटला पाहिजे.’’
‘‘पण आपल्याकडे लोक वेगळ्या नजरेनं पाहतात.’’
‘‘हो. हे वास्तव आहे. प्रत्येक समाजाचे काही संकेत असतात. पाश्चात्त्य देशांतल्या सामाजिक अपेक्षा वेगळ्या आहेत.’’
‘‘म्हणजे आपण वेस्टर्न कपडे घालायचेच नाहीत?’’
‘‘असं कोण म्हटलं? मी फक्त एवढंच म्हणते, की कपडे निवडताना प्रसंग, ठिकाण आणि परिस्थिती यांचाही विचार करावा.’’
‘‘म्हणजे?’’