Ecotourism
esakal
पाऊल टाकता रानात, गंध फुलांची सोबत,
प्रवास हा नुसता नसे, मनात गुंतत जाई निसर्गरंगसे
आधुनिक काळात पर्यटन फक्त प्रवासाची संकल्पना राहिलेली नाही. ते आता समाजजीवन, स्थानिक अर्थकारण आणि पर्यावरण यांचा महत्त्वाचा भाग झाली आहे. पर्यटनाने माणसाचे मन प्रसन्न होते. त्यातून माणूस अनुभवाने समृद्ध होतो. समुद्राच्या लाटांवर स्वार होऊन दूरवर नजर रोखणे असो किंवा डोंगराच्या माथ्यावर पोहोचून ढगांच्या दुलईत विसावणे असो, प्रत्येक क्षण माणसाला पुन्हा स्वतःशी जोडतो.
आजच्या युगात पर्यटन ही उद्योगधंद्याची मोठी शाखा झाली आहे. कोरोना उद्रेकाचा अपवाद वगळता ती सातत्याने विस्तारत आहे. उन्हाळ्याच्या आणि दिवाळीच्या सुट्ट्यांदरम्यान रेल्वे प्रवाशांनी भरभरून वाहतात, तसेच देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय विमानतळांवरील गर्दीही वाढते. देशांतर्गत विमान प्रवाशांची संख्या गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा चार टक्क्यांनी वाढल्याचे भारतीय विमानतळ प्राधिकरणाने दिलेल्या आकडेवारीतून स्पष्ट होते.
ही संख्या ११ कोटींच्या वर गेली आहे. तर आंतरराष्ट्रीय विमानतळांवरून अडीच कोटींपेक्षा जास्त प्रवासी वेगवेगळ्या देशांच्या दिशेने उड्डाण करत असल्याचेही यातून समजते. त्याबरोबरच नवीन हॉटेल्स, आलिशान रिसॉर्ट्स, कॅफेज आणि पर्यटन सुविधा उभ्या राहत आहेत.