महेश जनार्दन उशीर
अलीकडे पुन्हा गावात जाण्याची संधी मिळाली. यंदा फक्त खिडकीतून पाऊस न पाहता मोकळ्या आकाशाखाली उभं राहून चिंब होईपर्यंत पावसात भिजता आलं. डोळे मिटून आकाशाकडे तोंड करून स्वतःला झोकून देता आलं. हरवलेलं पावसाळ्यातलं बालपण पुन्हा लहान होऊन तरुण वयातही जगता आलं.
कालपरवा एका शाळेसमोरून जात असताना काही लहान मुलांना भर पावसात एकमेकांवर चिखल उडवत आणि रस्त्याच्या कडेला साचलेल्या पाण्यात धुंद होऊन खेळताना पाहिलं. सुरुवातीला फारसं काही विशेष वाटलं नाही, पण थोडं पुढं गेल्यावर मनात आठवणींचे ढग दाटून आले...
त्या लहानग्यांच्या खोड्या आता निरागस वाटू लागल्या. त्यांच्यात मला माझं आणि माझ्या मित्रांचं प्रतिबिंब दिसू लागलं. लहानपणी पावसाळ्यात केलेली धमाल, चिखलानं माखलेले कपडे, पावसाच्या पाण्यानं भिजलेली वह्या-पुस्तकं आणि घरी आल्यावर आईकडून खाल्लेला मार हे सारं डोळ्यासमोर आलं.