Mansoon Day : ‘कैसे जाऊ मिलन पिया से सखी, बैरन भई बरखा’

वर्षाऋतूसंदर्भात ‘मल्हार’ या शब्दाचा अर्थ पाहिल्यास आजूबाजूचे औदासिन्य, मनातील आणि भौतिक जगातील अस्वच्छता दूर करणारा असा तो ‘मल्हार’ असा गुणविशेष दिसून येतो.
Mansoon Day
Mansoon Daysakal

तप्त उन्हाळ्यानंतर मनाला, निसर्गाला आलेला शीण, उदासी आपल्या सरींनी घालवून मन आणि वातावरण प्रसन्न करणारा तो ‘मल्हार’.

बरसन लागी रे

बदरिया घन घोर

पिया बिन नैना मोरे

लागे रे बरसन लागी रे।।

माझ्या गुरू स्वरयोगिनी प्रभाताईंची मियाँ मल्हार रागातील ही बंदिश ऐकली, की वर्षाऋतू व त्यातील भावोत्कटता डोळ्यासमोर अवतरते.

वर्षाऋतू, भारतीय संस्कृती, भारतीय रागसंगीत यांचे एक विशेष नाते, वेगवेगळ्या गीतांमधून बंदिशींमधून, चालीरीतींमधून अनुभवायला मिळते. वर्षाऋतू हा एक विशेष सृजनाचा काळ, आणि स्वाभाविकच कलाकारांना हा काळ वेगळी ऊर्जा देतो.

वर्षाऋतूसंदर्भात ‘मल्हार’ या शब्दाचा अर्थ पाहिल्यास आजूबाजूचे औदासिन्य, मनातील आणि भौतिक जगातील अस्वच्छता दूर करणारा असा तो ‘मल्हार’ असा गुणविशेष दिसून येतो. तप्त उन्हाळ्यानंतर मनाला, निसर्गाला आलेला शीण, उदासी आपल्या सरींनी घालवून मन आणि वातावरण प्रसन्न करणारा तो ‘मल्हार’.

मल्हार या रागाविषयी काही दंतकथाही प्रचलित आहेत. अकबराच्या दरबारातील गायक तानसेन यांची एक आख्यायिका सांगितली जाते. संगीतसम्राट म्हणून ख्याती मिळवलेल्या तानसेन यांनी दीपक राग गायला असता दरबारातील सर्व दिवे उजळले. परंतु त्यामुळे तानसेन यांच्या शरीरामध्ये दाह उत्पन्न झाला. ताना आणि रिरी या गायिका बहिणींनी मल्हार राग गाऊन तो दाह शांत केला, आणि संगीत जगतात मल्हार राग विशेषत्वाने प्रसिद्धीस आला, अशी एक कथा सांगितली जाते.

संगीत शास्त्रानुसार मल्हार राग सादरीकरणाची वेळ रात्रीची आहे. परंतु वर्षाऋतूमध्ये तो कोणत्याही प्रहरात गायला -वाजवला जातो. मल्हार रागामधील बंदिशींमध्ये बरसणारे ढग, विजांचा कडकडाट, चातक, मोर, कोकीळ, तसंच विरह, मीलन, आस, भक्ती, शृंगार असे विविध विषय आढळून येतात.

लोकसंगीताप्रमाणेच भारतीय रागसंगीतातही वर्षाऋतूची अतिशय सुंदर दखल घेतलेली आढळून येते. राग मल्हार व पावसाळा यांचे विशेष नाते आपल्याला पाहायला मिळते. गौड मल्हार, मियाँ मल्हार, मेघ मल्हार या प्रमुख मल्हारांबरोबरच नायकी मल्हार, शुद्ध मल्हार, मीरा मल्हार, कुकुभ मल्हार, युगप्रवर्तक गायक पं. कुमार गंधर्व यांचा गांधी मल्हार, नट मल्हार, धुलिया मल्हार असे अनेक अप्रचलित प्रकारही ऐकायला मिळतात.

किराणा घराण्याच्या ज्येष्ठ गायिका प्रभाताईंनी देखील त्यांच्या अनेक बंदिशींमधून पावसाची वेगवेगळी रूपे व्यक्त केली आहेत, तसेच पटदिप मल्हार ह्या बुद्धीला आव्हान आणि मनाला प्रसन्नता देणाऱ्या नवीन रागरूपाची भर आपल्या सृजनाने त्यांनी रागपरंपरेत घातली आहे.

Mansoon Day
Balgandharva Music Festival : ‘चित्रवेणू’ अविष्कार अन् शास्त्रीय संगीताची अनुभूती

मल्हार रागाव्यतिरिक्तही इतर अनेक रागांमधील विविध बंदिशींमधून आपल्याला पाऊस अनुभवायला मिळतो. मा. कृष्णराव यांची भूप रागातील ‘चहू बरसन लागी’, केदार रागातील ‘सावन की बूंदनीया’ वृंदावनी सारंग रागातील ‘बादल जल बरस रहत’, प्रभाताईंची बागेश्री रागातील ‘जा रे जा बदर तू जा’, सुयोग कुंडलकर यांची शहाणा रागातील ‘अत हि घनघोर’, कुमार गंधर्व ह्यांच्या मालवती रागामधील ‘चला जा चला जा रे बदरा’ अशी अनेक उदाहरणे. वर्षाऋतूमधील विरह, शृंगार, करुणा, आनंद, हुरहूर अशा वेगवेगळ्या भावना या साऱ्या बंदिशी श्रोत्यांसमोर ठेवतात.

उपशास्त्रीय संगीताच्या समृद्ध दालनातीलही एक मोठा भाग वर्षाऋतूशी जोडलेला आहे. ठुमरी -दादरा घाटामधील कजरी, झुला, सावन ठुमरी असे प्रकार वर्षाऋतूशी निगडित आहेत. ज्येष्ठ गायिका सिद्धेश्वरी देवी, रसूलन बाई, पं. गिरिजा देवी, विदुषी शोभा गुर्टू, डॉ. प्रभा अत्रे अशा मातब्बर गायिकांनी तसेच उ. बड़े गुलाम अली खाँ, पं. जगदीश प्रसाद, पं. छन्नूलाल मिश्रा, पं. राजन आणि पं. साजन मिश्रा, पं अजय चक्रवर्ती अशा अनेक गायकांनी उत्तमोत्तम रचना सादर केल्या आहेत. ‘कैसे जाऊ मिलन पिया से सखी, बैरन भई बरखा’, ‘आई रितू सावन की पिया घर नाही’, ‘बूंद बूंद लागे बरसन’ अशा वेगळ्यावेगळ्या ठुमरी दादरा घाटांमधल्या रचना तसेच ‘घिरके आई बदरिया’, ‘सावन की रितू आयो री सजनीया’, ‘अब के सावन घर आजा’, ‘बरसन लागी बदरिया रुम झूम के’, ‘छायी घटा घनघोर’ अशा प्रभाताईंनी सादर केलेल्या अनेक रचना आपल्याला ऐकायला मिळतात.

Mansoon Day
World Music Day : म्युझिकमध्ये आहे जादू! तानसेनने सम्राट अकबरासाठी केली होती या रागाची निर्मिती

सदारंग-अदारंग या बंदिशकारांपासून आजपर्यंतच्या अनेक बंदिशकारांनी आपल्या उत्तमोत्तम रचनांद्वारे पाऊस व्यक्त केला आहे. मराठी व हिंदी चित्रपट सृष्टीतही अनेक दिग्गज गीतकार, संगीतकार व गायकांनीही आपल्याला पावसाच्या वेगवेगळ्या रूपांचा नजराणा दिला आहे.

वर्षाऋतूचे स्वागत करताना देशभरातल्या विविध शहरांमध्ये ‘मल्हार महोत्सवांचे’ आयोजन होते. माझ्या स्मरणात अशा असंख्य मैफली आहेत. पं. भीमसेन जोशी यांचा दमदार सूर मल्हार, डॉ. प्रभा अत्रे यांचा हळूवार मियाँ मल्हार, मालिनीताई राजूरकर यांचा प्रसन्न गौड मल्हार, पं. शिवकुमार शर्मा यांनी संतूरवर छेडलेला मेघ मल्हार, गंगूबाई हनगळ यांचा नट मल्हार, गानसरस्वती किशोरीताईंचा आनंद मल्हार. अशा अनेक मैफलींमधून त्या त्या कलाकाराच्या मनातला मल्हार ऐकताना या रागाच्या वातावरणाची विस्तृत ओळख होत गेली.

Mansoon Day
Tremble On Music : संगीत कानावर पडताच आपोआप कसे थिरकतात पाय? हे आहे कारण

देशविदेशातून माझ्या मैफलींमधून, तसेच, संकल्पनाधिष्ठीत कार्यक्रमांमधून वर्षाऋतूशी संबंधित बंदिशी, झुला, कजरी, सावन, भजन, सादर करताना ह्या ऋतूमधील निसर्ग, निर्सगात होणारे बदल, निसर्गातील चैतन्य, वेगवेगळ्या भावना यांची सांगितिक रूपे मला आनंद देऊन जातात, आणि अशा बंदिशींना श्रोत्यांकडून मिळालेली कौतुकाची थाप, मिळालेला भरघोस प्रतिसाद, प्रेम हे नक्कीच अवर्णनीय आहे. आणि मला ते अनुभवायला मिळाले याचा आनंद आहे.

Mansoon Day
Music Health : संगीतातील राग, बरे करतात मानसिक आजार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com