संजीव साबडे
मुंबईतील लाखो लोकांना आजही घरून बस वा रिक्षानं रेल्वे स्टेशन, मग लोकलनं आणि उतरल्यावर पुन्हा बसनं किंवा चालत प्रवास करावा लागतो. असंच परत घरी येताना. मुंबईत मेट्रोचं जाळं पूर्णपणे पसरल्यावर यातल्या किमान निम्म्या लोकांना असा तिहेरी पद्धतीचा प्रवास बहुधा करावा लागणार नाही. घरून थेट कार्यालयापाशी पोहोचता येईल. फारतर मधे मेट्रो बदलावी लागेल.
’झुकू झुकू झुकू झुकू आगीनगाडी, धुरांच्या रेषा हवेत काढी...’ हे गाणं ऐकण्यात लहानपण गेलं. नंतर गल्ली ते दिल्ली वगनाट्यातलं ‘ब्रॉडगेज आणू ब्रॉडगेज आणू’ गाणं ऐकलं. वसंत बापटांची ‘दख्खन राणीच्या बसून कुशीत...’ ही कविता आवडली. आशीर्वादमधल्या ‘रेलगाडी रेलगाडी, यहाँ से वहाँ, वहाँ से यहाँ’मध्ये दंग झालो.
‘मेरे सपनो की रानी’ हे आराधनातलं गाणं वयात आल्यावरचं. त्यातली दार्जिलिंगची छोटी ट्रेन मन मोहवणारी होती. बोरिवलीत नॅशनल पार्कच्या टॉय ट्रेनमध्ये बसलो तेव्हा गंमत वाटली होती. माथेरानला रखडगाडीचा अनुभव घेतला.
शोलेतला रेल्वेचा अनुभव थरारक होता. द बर्निंग ट्रेनमुळे छातीत धडधडलं. काही वर्षांपूर्वी परिणीतामधलं ‘कस्तो मज़ा है रेलैमा’, दार्जिलिंगच्या झाडीझुडुपांतून धावणारी ती छोटीशी गाडी आणि त्या लहान मुलांचा आवाज, आहाहा! हे सगळे रेल्वेचे ‘अनुभव’ घेतले, पण ‘प्रवास’ केला तो मात्र गर्दीत जीव गुदमरून टाकणाऱ्या मुंबईच्या उपनगरी रेल्वेनं.