कॉन्स्पिरसी फाइल्स ।रवि आमले
स्टेड अनेकांना मोठी सुरस आणि चमत्कारिक कहाणी सांगत असत. टायटॅनिक बुडाली त्या रात्रीही जेवताना त्यांनी त्यांच्या सोबतच्या प्रवाशांना ही कथा ऐकवली होती. बोटीतून वाचलेल्यांपैकी एकाने नंतर ही माहिती न्यू यॉर्क वर्ड या दैनिकाच्या बातमीदाराला दिली. बस्स. कटकाल्पनिकाकारांसाठी एवढे पुरेसे होते. त्यांनी यावरून ‘सिद्धांत’ रचला, की इजिप्शियन ममीच्या शापामुळे टायटॅनिक बुडाली...
पत्रकारितेच्या विद्यार्थ्यांना विल्यम टी. स्टेड हे नाव किमान ऐकून तरी माहीत असते. ब्रिटिश पत्रकारितेला नवा आयाम देणारे पत्रकार, पॉल मॉल गॅझेट या दैनिकाचे संपादक ही त्यांची ओळख. ते शोधपत्रकारही होते. लंडनमध्ये चालणाऱ्या बालवेश्याव्यवसायाविरोधात त्यांनी रान उठवले होते. स्वतः त्या घाणेरड्या धंद्याच्या मुळाशी जाऊन, अनेकांशी बोलून, पाहून त्यांनी जे वृत्तांत लिहिले, त्यातून तत्कालीन सरकारला या गैरप्रकाराविरोधात कायदा करावा लागला होता.
त्यावेळी त्यांनी एलिझा आर्मस्ट्राँग नामक एका तेरा वर्षीय बालिकेला वेश्या व्यवसायातील दलालाकडून विकत घेऊन मोठी सनसनाटी माजवली होती. तो प्रकार त्यांनी केला तो अर्थातच व्यवस्थेच्या डोळ्यांवरचे पडदे दूर व्हावेत याकरिता. त्या प्रकरणाचा एवढा गवगवा झाला, की पुढे जॉर्ज बर्नार्ड शॉ यांनी त्या वृत्तांतातून प्रेरणा घेऊन पिग्मॅलियन हे नाटक लिहिले, तेव्हा त्यातील नायिकेचे नाव एलिझा असेच ठेवले.