राहुल हांडेमध्ययुगीन काळात दोन धर्मांच्या संघर्षात भरडल्या जात असलेल्या भारतासाठी नानकदेवांची भूमिका अत्यंत महत्त्वाची होती. त्यामुळे मध्ययुगीन भारताच्या राजकीय व धार्मिक इतिहासात नानकदेवांचे स्थान अनन्यसाधारण ठरते. .लाहोरपासून तीस मैल अंतरावर वसलेले एक छोटे गाव तलवंडी रायन्नोयी. गावाच्या जवळून वाहणाऱ्या विस्तीर्ण रावी नदीचे हिरवे काठ तलवंडीच्या सौंदर्याची कल्पना करण्यास पुरसे होते. तसे हे जमीनदाराचे गाव होते. बारा गावाची जमीनदारी असणारे रायबुलार धर्मांतरीत मुसलमान. अत्यंत सहिष्णू. त्यामुळे त्यांच्या जमीनदारीत प्रजा त्याकाळाच्या तुलनेत सुखात होती. १५ एप्रिल १४६९ या दिवशी तलवंडीवासी आपल्या दैनंदिन व्यवहारात व्यग्र होते. जमीनदार रायबुलार यांचे कुळकर्णी होते मेहता कल्याणदास. काळूराम या नावाने ते तलवंडी परिसरात प्रसिद्ध होते. काळूराम रायबुलारांकडे कुळकर्णी असले तरी एक सधन शेतकरी म्हणूनही त्यांचा लौकिक होता. त्यांची पत्नी त्रिपताका ऊर्फ तृप्तादेवी. आपल्या नावाप्रमाणेच एक प्रसन्न व गृहकर्तव्यदक्ष गृहिणी. नानकी ही त्यांची कन्या. तिचा जन्म आपल्या आजोळी म्हणजे नानांच्या घरी झाला. नानांची लाडकी म्हणून तिचे नाव नानकी ठेवण्यात आले. काळूराम व तृप्तादेवी हे अत्यंत धर्मपरायण दांपत्य होते. त्यांच्या जीवनातील वैशाख शु.३ विक्रम संवत १५२६ अर्थात १५ एप्रिल १४६९ हा दिवस भविष्यात असामान्य दिवस म्हणून इतिहासात नोंदवला जाणार होता. तृप्तादेवींनी या दिवशी एका मुलाला जन्म दिला. रावीच्या काठावर त्या बालकाच्या रूपाने ‘शांती-सेवा-समता-बंधूता’ या तत्त्वांचा उदय झाला होता. हे बाळही आपल्या मोठ्या बहिणीप्रमाणेच त्याच्या नानांच्या घरी जन्मले आणि त्यांचे लाडके. म्हणून त्याचे नाव ठेवण्यात आले नानक. नानकीचा भाऊ नानक असाही संदर्भ यामागे असावा. नानक या शब्दाचा अर्थ ‘अन्य कुणासारखा नाही’ असाही सांगितला जातो.तलवंडीच्या मातीत जन्मलेले हे बाळ सामान्य नव्हते. ते तलवंडीला जगाच्या नकाशावर आणि इतिहासात विशेष स्थान देणार होते. मध्ययुगातील अंधाराला प्रकाशमान करणारे गुरू नानकदेवांची जन्मभूमी म्हणून तलवंडी गाव चिरंतन पावित्र्याचे धनी झाले. आज तलवंडी रायन्नोयीचा उल्लेख जगभरात ‘ननकाना साहिब’ म्हणून अत्यंत आदराने केला जातो. नानकदेवांच्या जन्माच्या आधी पंजाब प्रांत मुस्लिम आक्रमणांनी अक्षरशः तुडवला गेला होता. इ.स. १३९८मध्ये तैमूरलंगच्या आक्रमणाने दिल्लीच्या तुर्क सत्तेला जबरदस्त हादरा दिला. तैमूरचा एक नातू पीर महम्मद सर्वप्रथम भारतावर आक्रमण करण्यासाठी निघाला होता. सहा महिने वेढा देऊन त्याने मुलतान काबीज केले. एप्रिल १३९८ मध्ये तैमूर स्वतः समरकंद येथून मोठे सैन्य घेऊन भारतावर आक्रमणासाठी निघाला. सिंधू, झेलम व रावी पार करत सप्टेंबरमध्ये तो मुलतानजवळील तुलुंबा येथे पोहोचला. त्यानंतर भटनेरहून पुढे निघाला. त्यावेळी तुघलक घराण्याचा राज्यकारभार दोन सुलतानांकडून व दोन ठिकाणांहून सुरू होता. मुहम्मद तुघलक दिल्लीहून आणि नुसरत शाह तुघलक फिरोजाबादहून राज्यकारभार करत होते. तुघलक घराणे खिळखिळे झाले होते. असे असताना पानिपतजवळ मुहम्मद तुघलकाच्या सैन्याशी तैमूरच्या सैन्याची गाठ पडली. तैमूरने मुहम्मदचा पराभव केला. मुहम्मद आणि त्याचा वजीर मल्लू इक्बाल यांनी पळ काढला आणि गुजरातमध्ये तळ ठोकला. तैमूरलंगाने युद्धाच्या दुसऱ्या दिवशीच दिल्लीत प्रवेश केला. तो डिसेंबरचा महिना होता. पाच दिवस दिल्लीची यथेच्छ लूट करून तो समरकंदला परतण्यासाठी निघाला. त्याला भारतात राहण्यात रस नव्हता. परतताना तो मेरठ, हरिद्वार,कांगडा व जम्मूमार्गे लूट करत गेला. तैमूरलंगच्या स्वारीने तुघलक घराण्याची सत्ता अखेरच्या घटका मोजू लागली. .तैमूरलंग परतल्यानंतर त्याने नेमलेल्या राज्यपालाने खंडणी पाठवणे बंद केले. मुहम्मद तुघलक याने वजीर मल्लू इक्बालच्या साहाय्याने पुन्हा दिल्लीवर कब्जा मिळवला. मात्र तुघलकांचे राज्य आता केवळ पालमपर्यंत सीमित झाले होते. १४१२मध्ये मुहम्मद तुघलकचा मृत्यू झाला. त्यानंतर लगेच १४१३मध्ये तैमूरलंगने नियुक्त केलेला पंजाबचा प्रांतपाल खिज्र खान आणि दौलतखान लोदी यांच्यात सत्तासंघर्ष झाला. खिज्र खानापासून सय्यद घराण्याची व दौलतखानापासून लोदी घराण्याची सत्ता स्थापन झाली. दौलतखानने काही काळ दिल्लीची काबीज केली, मात्र १४१४मध्ये खिज्र खानाने दौलतखान लोदीकडून दिल्लीची सत्ता मिळवली. त्यानंतर सुमारे ३७ वर्षे खिज्र खानच्या सय्यद घराण्याने दिल्लीवर राज्य केले. १४५१पासून लोदी घराण्याची सत्ता दिल्लीवर स्थापन झाली. लोदी हे दिल्लीवर राज्य करणारे पहिले अफगाण घराणे होते. १४८९मध्ये बहलोलखान लोदीच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा निजामखान दिल्लीच्या गादीवर आला. दिल्लीच्या तख्तावर बसल्यावर निजामखानने स्वतःला सुलतान सिकंदर शाह अशी उपाधी लावली. पुढे तोच सिंकदर लोदी म्हणून ओळखला गेला. सिंकदर लोदी कर्तबगार निघाला. त्याने त्याच्या राज्याच्या सीमा प्रचंड विस्तारल्या, मात्र तो आपल्या पित्याप्रमाणे लोकप्रिय शासक होऊ शकला नाही. सिंकदर लोदीचा १५१७मध्ये मृत्यू झाल्यानंतर त्याची दोन मुले इब्राहिम आणि जलाल यांच्यात सत्तासंघर्ष झाला. सत्तासंघर्षात इब्राहिमखान लोदीची सरशी झाली. आपला भाऊ जलाल याला ठार करून इब्राहिम १५१८मध्ये लोधी साम्राज्याचा सुलतान झाला. मात्र इब्राहिम लोदीचा काळ अत्यंत अल्प ठरला. त्याचे राज्य अंतर्विरोधांनी पोखरले होते. तैमूरलंगचा नातू जहिरुद्दीन मोहम्मद बाबराने २१ एप्रिल १५२६ला पानिपतच्या रणांगणावर इब्राहिमखान लोदीचा पराभव केला.इब्राहिमखान लोदीच्या मृत्यूमुळे भारतातील अफगाण सत्ता संपुष्टात आली. बाबराच्या रूपाने भारतात मोगल साम्राज्याची स्थापना झाली. अफगाण लोदी घराण्यात तीनच सुलतान झाले असले तरी मोगलांनंतर भारतावर सर्वाधिक काळ राज्य करणारे घराणे म्हणून लोदी घराणे इतिहासात ओळखले जाते. लोदी घराण्याने त्यांच्यापूर्वीच्या तुर्क राज्यकर्त्यांचीच शासन व्यवस्था स्वीकारली होती. असे असले तरी हिंदू-मुस्लिम समन्वयाला त्यांच्या काळात प्रारंभ झाला होता. त्यांच्या पूर्वीच्या मुसलमान राजकर्त्यांच्या तुलनेत ते अधिक उदार होते. राजकारणात धर्माला महत्त्व देण्याऐवजी राजकारणाला धर्म मानण्यावर त्यांचा भर होता. त्यामुळे बहुसंख्य हिंदू प्रजेशी धर्माच्या नावाखाली अन्याय वागणूक करण्याऐवजी त्यांच्या सहकार्याने आपली सत्ता भक्कम ठेवण्यावर लोदी राज्यकर्त्यानी लक्ष केंद्रित केले होते. त्यामुळे लोदी घराण्याच्या सत्तेची पाळेमुऴे भारताच्या मातीत खोलवर रुजली. लोदी घराण्याच्या काळात हिंदू-मुस्लिम सद्भावाचे एका अर्थाने बीजारोपण झाले. असे असले तरी बाबर-हुमायून यांच्या काळात राजकीयदृष्ट्या भारत पुन्हा एकदा ढवळून निघाला. कारण अफगाण राज्यकर्ते जाऊन तुर्क मोगल राजकर्ते भारतात येण्याचा व स्थिरावण्याचा हा कालखंड होता. .मुस्लिम राज्यकर्त्यांच्या या कालखंडाची पार्श्वभूमी समजल्यावरच आपल्याला नानकदेवांच्या महान कार्याची प्रचिती येऊ शकते. लोदी घराण्याच्या कालखंडात बालपण व तारुण्य व्यतीत केलेल्या नानकदेवांनी आयुष्याच्या उत्तरार्धात बाबराच्या रूपाने मोगल घराण्याचा उदयकाळ अनुभवला.लोदी घराण्याच्या कालखंडात हिंदू-मुस्लिम समन्वय साधणाऱ्या सुफी संप्रदायाचा विस्तार झाला आणि त्याचबरोबर मध्ययुगीन भारत हा भक्ती आंदोलनांचा सुर्वणकाळ अनुभवत होता. शैव परंपरेतील नाथ संप्रदाय आणि सुफी संप्रदाय यांच्यात तत्त्वज्ञानात्मक आदान-प्रदान नानकदेवांच्या आधी सुमारे अडीचशे वर्षांपासून सुरू झालेले होते. तसेच १४व्या शतकापासून वैष्णव संप्रदाय आणि सुफी यांचा समन्वय प्रारंभ झाला होता. ही राजकीय, धार्मिक, सामाजिक व सांस्कृतिक पार्श्वभूमी लक्षात घेतल्यावरच आपल्या नानकदेवांच्या महान जीवनकार्याचा यथायोग्य परिचय करून घेता येतो.नानकदेव दोन पूर्णतः भिन्न धर्म आणि संस्कृती यांच्या संघर्षाच्या व समन्वयाच्या काळात जन्मलेले होते. राजकीय दुर्बलता, धार्मिक-सामाजिक शोषण, कर्मकांड, पाखंड यांनी ग्रस्त भारताला प्रकाशाची आवश्यकता होती. हा प्रकाश पंजाबच्या मातीतून निर्माण होणार होता. भारतावर झालेले प्रत्येक आक्रमण सर्वप्रथम छातीवर झेलणाऱ्या पंजाबात नानकेदव जन्मले. त्यामुळे त्यांनी हे आव्हान सर्वप्रथम स्वीकारले. हिंदू आणि सूफी तत्त्वज्ञानाच्या मिलाफातून एका मानवतावादी धर्माचे बीजारोपण त्यांनी केले. भाई मर्दाना यांच्या माध्यमातून हिंदू-मुस्लिम समन्वयाचा संदेश दिला. भाई मर्दाना हा मुस्लिम माणूस त्यांचा पहिला अनुयायी म्हणून ओळखला गेला. .नानकदेवांनी हिंदू धर्मातील व संस्कृतीतील प्रत्येक चांगल्या तत्त्वाचा व महात्म्याचा स्वीकार केला. मुस्लिम धर्मातील सूफी तत्त्वांचा आणि महात्म्यांचाही त्यांनी स्वीकार केला. अशा समन्वयातून माणसाला माणूस बनवण्यासाठी धर्म स्थापन करण्यात आलेला आहे, मानवतेचा बळी घेण्यासाठी नाही, हा संदेश त्यांनी दिला. परमेश्वरापर्यंत पोहोचण्यासाठी शुद्ध भाव आणि मानवतेची सेवा महत्त्वाची आहे, हे नानकदेवांनी अत्यंत सहजपणे सांगितले आहे. आपण एका नव्या धर्माची रुजवात करत आहोत, याची कल्पना त्यांना नव्हती किंवा त्यांचा तसा उद्देशदेखील नव्हता. लोकांनीच त्यांच्या तत्त्वज्ञानाला आणि त्यांच्या शिष्यांना ‘नानक पंथ’ संबोधन दिले. भविष्यात नानक पंथ शीख धर्मात परिवर्तित झाला. मानवतेचे संरक्षण आणि संवर्धन एवढेच त्यांचे ध्येय होते. त्यांना कोणत्याही धर्मातील भेद, संघर्ष आणि कर्मकांड नको होते. माणूस म्हणून जगत असताना त्यांना परमेश्वराशी सहज संवाद साधायचा होता. आपले विचार आणि आचरण विशुद्ध ठेवणे आणि मानवता जोपासणे त्यांच्यासाठी महत्त्वाचे होते. काशीपासून काब्यापर्यंत प्रवास करून त्यांनी हिंदू-मुस्लिम धर्मातील मौलिकाचा स्वीकार केला आणि व्यर्थतेचा त्याग केला. त्यामुळे दोन्ही धर्मातील माणसांशी ते सहज संवाद साधू शकले. मध्ययुगीन काळात दोन धर्मांच्या संघर्षात भरडल्या जात असलेल्या भारतासाठी नानकदेवांची भूमिका अत्यंत महत्त्वाची होती. त्यामुळे मध्ययुगीन भारताच्या राजकीय व धार्मिक इतिहासात नानकदेवांचे स्थान अनन्यसाधारण ठरते. नानकदेव ही त्या युगाची नितांत गरज होती. भगवान बुद्ध, भगवान महावीर, गोरक्षनाथ, कबीर, चक्रधर स्वामी, महात्मा बसवेश्वर, ज्ञानेश्वर-नामदेव-तुकोबा आणि नानकदेवांसारखे महापुरुष कोणत्याही काळाचे, सत्तेचे, स्वार्थाचे, समाजाचे नसतात तर ते अखिल मानव जातीचे चिरंतन संचित असतात. नानकदेवांचे व्यक्तिमत्त्व आणि तत्त्वज्ञान जेव्हा आपण पाहतो तेव्हा तो एक महासागर आहे, अशीच प्रतीती आल्याशिवाय राहत नाही. जगातील जे सर्व काही चांगले आहे, त्याचे दर्शन नानकदेवांमध्ये होते. रावीच्या प्रवाहाने इतिहासाचे जे-जे पर्व पाहिले-पचवले त्या सर्व इतिहासाचे सार नानकदेवांच्या विचारधारेत सामावलेले आहे. ज्या रावीच्या पाण्यावरून आक्रमणांच्या लाटा भारताच्या भूमीवर आल्या, त्या रावीच्या काठावरच नानकदेवांसारखा कल्पवृक्ष बहरला आणि विसावला आहे.(लेखक धर्म इतिहास व साहित्य या विषयांचे अभ्यासक आहेत.)---------------------.सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.