प्रतिनिधी
इसवी सनाच्या दहाव्या शतकात पर्शियामधील राजवटीकडून होणाऱ्या छळापासून सुटण्यासाठी स्थानांतर करून भारतात (मुख्यतः गुजरातमध्ये) स्थायिक झालेल्या पारशी समाजाची आधुनिक काळातली मुख्य ओळख म्हणजे उद्योग आणि व्यापार. भारतीय उद्योग आणि ज्ञान परंपरांशी जोडलेली जमशेदजी टाटा, बैरामजी जीजीभॉय, डॉ. होमी जहांगिर भाभा, फली नरिमन, सॅम माणेकशॉ ही पारशी समाजातली काही नावं चटकन आठवतात. महाराष्ट्राचा विचार करायचा तर आजच्या आपल्या आर्थिक राजधानीच्या, मुंबईच्या जडणघडणीच्या प्राथमिक दिवसांमध्ये ज्यांनी ज्यांनी मोलाचा सहभाग दिला त्यांत अनेक पारशी कुटुंबे आघाडीवर होती.