

Nepal Flash Floods and Climate Change
esakal
डॉ. श्रीकांत कार्लेकर
नेपाळमधील विनाशकारी पूर नेहमीसारखा पावसामुळे आलेला नसून, भूगर्भीय हालचाली किंवा बर्फाची दरड कोसळल्यामुळे आला असल्याचे स्पष्ट झाले. हरितगृह वायूंचे उत्सर्जन झपाट्याने कमी करणे, पूर्वसूचना प्रणालींमध्ये गुंतवणूक करणे आणि संवेदनशील पर्वतीय प्रदेशांवर अधिक चांगले लक्ष ठेवणे, हे उपाय मानवाला भविष्यातील संभाव्य भीषण महापुरांपासून वाचवू शकतात.
नेपाळ... हिमालयाच्या कुशीत वसलेला नितांत सुंदर देश. परंतु, हिमालयाचा प्रदेश या देशासाठी अलीकडे धोकादायक ठरतो आहे. सतत होणारे भूस्खलन आणि येणारे पूर या देशासाठी मोठी डोकेदुखी ठरत आहे. ता. २६ ऑगस्ट २०२६ रोजी नेपाळमध्ये आलेल्या आकस्मिक व विनाशकारी पुरामुळे भोटेकोशी आणि त्रिशुली या दोन्ही नद्यांच्या खोऱ्यांना मोठा फटका बसला. नेपाळ-तिबेट सीमेजवळ उंच ठिकाणी हिमनदीतील खडक आणि बर्फ कोसळल्यामुळे ही आपत्ती उद्भवली. त्यामुळे पाणी, चिखल आणि ढिगाऱ्यांचा अतिवेगवान व प्रचंड प्रवाह १,४२८ मीटर उंचीवरील जुन्या शायब्रु बेसी या गावाजवळ संगम असलेल्या भोटेकोशी-त्रिशुली नदीमार्गातून खाली वाहून गेला. हिमनदीच्या कोसळण्याचा पहिला फटका बसला सीमेजवळील भोटेकोशी खोऱ्याला. त्यामुळे काही वस्त्या आणि रसुवागढी, मितेरी पूल यांसारखी महत्त्वाची सीमा ठिकाणे वाहून आलेल्या गाळाखाली दबली गेली. भोटेकोशी नदीचा प्रचंड प्रवाह खाली त्रिशुली नदीमध्ये वाहत गेला. यामुळे नुवाकोट व धादिंग जिल्ह्यांतील त्रिशुली बाजार आणि वेत्रावतीसह नदीकाठच्या खालच्या भागातील परिसर पाण्याखाली गेले. परिणामी प्रमुख आणि झुलते पूलही कोसळले. भोटेकोशी-त्रिशुली कॉरिडॉरमधील बहुतेक जलविद्युत प्रकल्पांचे मोठे नुकसान तर झालेच, शिवाय अनेक कामगार बोगद्यांमध्ये अडकून पडले.
नेपाळला उद्ध्वस्त करणारा हा पूर उद्भवला तो हिमालयातील लांगटांग लिरुंग या हिमाच्छादित प्रदेशाच्या उत्तरेकडील उतारावरून अचानक अनामिक हिमनदीचे स्खलन झाल्यामुळे. नेपाळ-तिबेट सीमेवरील ७,१६५ मीटर अतिउंच भागात ही घटना घडली. हे ठिकाण हिमालयातील लेंडे खोला या २,११८ मीटर उंचीवरील आणि रसुवागढी या १,८२० मीटर उंचीवरील वस्तीच्या पूर्वेला अवघ्या १४ किलोमीटर अंतरावर आहे. या उंचीवरील हिमनदीचा खालचा लटकता भाग आणि त्याखालचा खडक सुमारे ५,६०० मीटर उंचीवरून तुटून वेगळे झाले आणि अनेक विध्वंसक घटनांची साखळी प्रक्रिया सुरू झाली. भोटेकोशी नदीच्या खोऱ्यात निसर्गाने रौद्र रूप धारण केले. पाणी, बर्फ, चिखल आणि खडकांची एक प्रचंड लाट नदीखोऱ्यात कोसळल्यामुळे अफाट जीवित आणि वित्तहानी झाली. पर्वताच्या सुमारे ५,६०० मीटर उंचीवरून बर्फ आणि खडकांचा अंदाजे १०० ते २०० दशलक्ष घनमीटर आकाराचा प्रचंड मोठा भाग तुटून वेगळा झाला आणि तो अंदाजे १,२०० मीटर खोल दरीत कोसळला... भोटेकोशी खोरे नेपाळमधील काठमांडू आणि तिबेटमधील ल्हासा यांना जोडणारा मुख्य दुवा आहे. या दुव्याचे नुकसान नेपाळ डोळ्यांदेखत पाहत राहिला.
उपग्रह प्रतिमांमधून पुरामुळे नेपाळमधील गावांच्या झालेल्या विनाशाचे व्रण दिसले. नवीन उपग्रह प्रतिमांमधून हिमनदी कोसळल्यामुळे अचानक आलेल्या प्राणघातक पुरामुळे नेपाळच्या त्रिशुली नदीकाठी झालेल्या विध्वंसाची व्याप्ती समोर आली. पुरापूर्वीच्या आणि नंतरच्या प्रतिमांमधून पुराच्या पाण्याचा आणि ढिगाऱ्यांचा प्रचंड प्रवाह खोऱ्यातून वाहून गेल्यामुळे गावे, पूल आणि जलविद्युत केंद्रे कशी उद्ध्वस्त झाली, हे स्पष्टपणे दिसून आले. प्रलयापूर्वीचा निसर्गरम्य परिसर आणि प्रलयानंतर निर्माण झालेला भकासपणा ही एकाच नेपाळची दोन चित्रे ठरली. त्रिशुली नदीत प्रवाहाच्या दिशेने २.५ किलोमीटरपेक्षा जास्त अंतरावर
१०० मीटर उंचीपर्यंत चिखल साचलेला दिसत होता. दक्षिणेकडे जाताना पुराने केलेल्या विध्वंसाच्या खुणा अधिक गडद होत गेल्या. काही अंतर दक्षिणेला असलेले तिमुरे नावाचे गाव जवळजवळ नाहीसेच झाले आहे. या ठिकाणी नदीचे किनारे तीव्र उताराचे असून, या उतारांवर असलेली बहुतेक घरे आता नष्ट झाली आहेत किंवा चिखलाखाली गाडली गेली आहेत. नदीच्या प्रवाहाच्या दिशेने आणखी दहा किलोमीटर खाली, जिथे त्रिशुली नदी शायब्रु बेसीजवळून नागमोडी वळणे घेत वाहते, तिथेही उपग्रहाच्या प्रतिमांमध्ये चिखल, दगड आणि इतर गोष्टींच्या ढिगाऱ्याखाली झाकलेले गाव हेच दृश्य नजरेस पडते. पूल आणि जलविद्युत केंद्रासह अनेक घरे आणि इतर वास्तू नाहीशा झाल्या आहेत. त्यामुळे साहजिकच जनजीवन विस्कळीत झाले आहे. पुराच्या तडाख्याला सामोरे गेलेल्या मोठ्या गावांपैकी एक त्रिशुली होते. उपग्रह प्रतिमेत दिसणाऱ्या दृश्यानुसार, सीमेपासून सुमारे ४५ किलोमीटर खाली असलेल्या या शहराच्या आणि आसपासच्या शेतजमिनींची ही संपूर्ण वस्ती व तिच्या खाणाखुणा महापुराने अक्षरशः पुसून टाकल्या आहेत. माणसांच्या राबत्याच्या ठिकाणी आता स्मशानशांतता पसरली आहे.