

Nifty Recovery After Recent Fall
esakal
भूषण महाजन
या घडीला जोखीम/परतावा गुणोत्तर छान जमले आहे. २२५००च्या पातळीची मनात तयारी ठेवली, तर तिथून किमान १००० ते १३०० अंशाची तेजी दिसते. सारा बाजारच आकर्षक पातळीवर आहे. मनात संयम असेल, तर आता खरेदीला सुरुवात करायला हवी. स्मॉल, मिड आणि मायक्रो कॅप शेअरमध्ये किंचित घसरण झाली आहे.
निफ्टी २३०००च्या खाली जाऊ नये असा आमचा होरा होता. २३५००ची आधारपातळी एकदा भेदल्यानंतर ती खाली कुठे थांबते ते कळत नव्हते. निदान गेल्या सप्ताहात (ता. १५ ते १८ सप्टेंबर) तरी निफ्टीने आमचे ऐकले. पुढे ती किती दिवस ऐकेल माहीत नाही, पण २३१०० अंशाचा आधार घेत ती काही अंश वर आली खरी. ही तेजीची सुरुवात आहे का? नक्कीच नाही. कारण आजवर झाली तेवढी पडझड पुरे झाली, शेअर पुन्हा केव्हा विकायचे ते वेळ आल्यावर ठरवू, असे ‘गोऱ्यांचे’ म्हणणे दिसते.
ता. १५ सप्टेंबरला अमेरिकेचे अनेक सूचक निर्देशक प्रसिद्ध झाले. तेथील महागाई प्रचंड वाढली आहे, दहा वर्षांच्या सरकारी रोख्यांचे व्याजदर पाच टक्क्यांना भिडले आहेत. फेडने व्याजदर वाढवल्याचे संकेत मिळत होते. समोरचा मल्ल फार ताकदवान दिसल्यास आपल्या पैलवानाने आखाड्यातून पळून जावे तशी विक्री १५ सप्टेंबरला झाली. पुन्हा जखमेवर मीठ चोळत यावर्षी फेड दुसऱ्यांदा व्याजदर वाढवेल असा इशारा दिला.