

Nifty New High Strategy
esakal
आणखी एक समाधानाची गोष्ट म्हणजे, चालू वर्षाच्या पहिल्या सहामाहीचा विकास दर जाहीर झाला आहे. अपेक्षा ७.८ टक्क्यांची होती, प्रत्यक्षात जीडीपी ८.२ टक्क्यांनी वाढला आहे. एक उत्साहवर्धक बाब म्हणजे, उत्पादन क्षेत्राचा विकासदर ९.२ टक्के दिसतोय. त्यात जीएसटी कमी केल्याचा परिणाम तर आहेच, पण अर्थव्यवस्थेचे सर्व घटक एकत्रितपणे काम करत आहेत हेदेखील जाणवते.
वाचकहो, आम्ही लिहिलेल्या ‘ग्यानबाची मेख’ या लेखात (ता. १५ नोव्हेंबर) रिलायन्स, एसबीआय व लार्सन तेजीचे नेतृत्व करतील व त्याबरोबर नवा उच्चांक होईल, असे सूचित केले होते. वरील तीन शेअरमध्ये एचडीएफसी बँकही सामील झाला आणि निफ्टीने २७ नोव्हेंबर रोजी नवे शिखर नोंदवले. २६३१०चा नवा सुळका करून निफ्टी खाली आली असली, तरी त्याने काही बिघडले नाही. सप्ताहाचा बंद २६२०२ म्हणजेच २६२०० या महत्त्वाच्या पातळीच्या वरच होता. पाहता पाहता तेजी अगदी उंबरठ्यावर येऊन पोहोचली. गंमत म्हणजे, गुंतवणूकदार गेले महिनाभर याच क्षणाची चातकासारखी वाट पाहत होते. सर्वांनाच आनंद झाला, पण जल्लोष काही झाला नाही. शेजारणीच्या मुलाचा पहिला नंबर आला, पण आपला मुलगा मात्र काठावर पास झाल्याचा जितका आनंद होईल तितकाच उल्हास दिसला. उलट आम्हाला सतत विचारणा होते आहे, की आता तर नवा हाय झालाय, आता काय विकू? आम्ही एकच सांगतो, विकायला हरकत नाही, पण तुमचा पोर्टफोलिओ वाढला आहे का? आणि किती?