Tropical Cyclones
Esakal
डॉ. श्रीकांत कार्लेकर
भारताच्या आजूबाजूच्या विशाल भूप्रदेशावर आणि समुद्रपृष्ठावर होणाऱ्या हवामान बदलाचा बारकाईने अभ्यास केला, तर एप्रिलपासूनच तयार होऊ लागणाऱ्या समुद्रावरील चक्रीवादळांच्या यंत्रणेचा थोडाफार तरी अंदाज करता येणे शक्य आहे. गेल्या काही वर्षांतील चक्रीवादळांच्या अभ्यासातून आता हे लक्षात येऊ लागले आहे.
जगातल्या सगळ्या महासागरांच्या सरासरी तापमानात सध्या वाढ होत आहे. समुद्राच्या सातशे मीटर खोलीपर्यंत एक दशांश अंश सेल्सिअसने वाढ जाणवते आहे आणि त्याचा मोठा परिणाम चक्रीवादळांच्या निर्मितीवर होतो आहे. गेल्या काही वर्षांपासून जवळजवळ दरवर्षी समुद्र आणि जमिनीच्या तापमान बदलाचे आकृतिबंध (Pattern) स्पष्ट करणारे संशोधन समोर येत आहे. समुद्रपृष्ठाच्या वाढलेल्या तापमानाची नोंद आज अनेक ठिकाणी करण्यात येत आहे. अवेळी येणारी वादळे, मान्सूनच्या वेळापत्रकात होत असलेले बदल यांसारख्या घटनांची सुरुवात समुद्रपृष्ठावरच होत असते. अभ्यासाअंती या वादळांच्या निर्मितीची चाहूल लागत असली, तरी ते संशोधन अजूनही तोकडेच पडत आहे, असे दिसून येत आहे.