

Operation Sindoor 2025
esakal
अमेरिका-इस्राईल विरुद्ध इराण संघर्ष पेटलेला आहे. होर्मुझच्या सामुद्रधुनीच्या कोंडीने तेल व नैसर्गिक वायूंचा पुरवठा विस्कळीत झाल्यामुळे भारतासह अनेक देशांच्या अर्थव्यवस्थेला धक्के बसले आहेत. काही दिवसांत संपेल अशी अपेक्षा असलेले हे युद्ध दीड महिन्यांपेक्षा जास्त काळ लांबले असताना दोन्ही बाजूंनी होणारा प्रोपगंडा आणि माहितीच्या युद्धामुळे सर्वसामान्य नागरिक संभ्रमात आहेत. दीर्घकाळ चाललेले रशिया-युक्रेन युद्ध, इस्राईल-अरब संघर्षांना समांतर माध्यमांमधील माहितीची लढाईही जग पाहत आहे. या पार्श्वभूमीवर पहलगामवरील दहशतवादी हल्ला आणि ऑपरेशन सिंदूरची वर्षपूर्ती जवळ आली असताना या घटनांच्या अनुषंगाने भारतात माहिती युद्ध कसे रंगले आणि त्यातून आपण कोणते धडे घेतले, हे पाहणे रंजक ठरू शकेल.
जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे २२ एप्रिल २०२५ रोजी दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात पर्यटकांची धर्म विचारून हत्या करण्यात आली. यात २६ निरपराध नागरिकांचा बळी गेला. यानंतर देशभर संतापाची लाट उसळली. उरीतील लष्करी छावणीवरील दहशतवादी हल्ल्यानंतरचे ‘सर्जिकल स्ट्राइक’ आणि पुलवामात लष्कराच्या वाहनांवर झालेल्या हल्ल्यानंतर झालेले ‘एअर स्ट्राइक’ यामुळे सरकार आणि सैन्यदले आता काय करणार, याची प्रतीक्षा भारतीय नागरिकांना होती. संतप्त जनभावनांचा दबाव दिवसेंदिवस वाढत होता. या पार्श्वभूमीवर भारतीय सैन्यदलाने पाकिस्तानातील नऊ दहशतवादी तळांवर अचूक हवाई हल्ले चढवले आणि ते उद्ध्वस्त केले, तो दिवस ७ मे २०२५. त्यानंतर दोन्ही देशांदरम्यान चार दिवस झालेला संघर्ष म्हणजे ‘ऑपरेशन सिंदूर’.
पहलगामचा हल्ला आणि त्याच्या उत्तरादाखल झालेल्या या संघर्षाला वर्ष पूर्ण होत असताना, त्यावेळी प्रत्यक्ष काय घडले याची उजळणी करतानाच माध्यमांच्या आणि माहिती युद्धाच्या आघाडीवर भारताने काय धडे घेतले, याचा आढावा घेणेही आवश्यक आहे. यासंबंधी माध्यमे आणि सामरिक विषयाचे तज्ज्ञ विविध पैलूंतून अभ्यास करत आहेत. मात्र, सजग नागरिक म्हणून सर्वसामान्य भारतीयांनाही याबाबत शिक्षित करणे आवश्यक आहे.