

Paithani Saree
esakal
‘महाराष्ट्राचे महावस्त्र’ अशी पैठणीची ओळख असली, तरी माझ्या दृष्टीने स्त्रीच्या भावविश्वाचे प्रतीक, ही पैठणीची ओळख तिच्यासारखीच सुंदर आणि अभिमानास्पद आहे. मराठी संस्कृतीत पैठणीला शुभवस्त्र मानले जाते. विवाह समारंभात वधूने पैठणी नेसणे हा जणू एका प्राचीन परंपरेचा, वारशाचा सन्मान असतो. त्यामुळे आजही लग्नात पैठणी नेसणे हे अनेकींचे स्वप्न असते. आयुष्यात एक तरी पैठणी घ्यायची असेही अनेकजणींचे स्वप्न असते. कारण पैठणी म्हणजे केवळ एक साडी नाही, तर ती दोन हजार वर्षांच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचे मूर्त रूप आहे. पूर्वी फक्त राजघराण्यातील स्त्रियाच हे गर्भरेशमी, सोन्याच्या जरीने विणलेले, अद्भुत नक्षीकाम आणि रंगसंगती असलेले वस्त्र परिधान करत, त्यामुळे पैठणीला एक वेगळी प्रतिष्ठा मिळाली. आजही अनेक घरांमध्ये पिढीजात वस्त्र म्हणून पैठणी एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे सोपवली जाते. पैठणीरूपाने परंपरा पुढे नेण्याची जबाबदारी आपल्यावर असल्याची भावना स्त्रीला एक नवा आत्मविश्वास देते. त्यामुळे पैठणी स्त्रीच्या अस्मितेचे प्रतीक ठरते.
कलात्मक विणकाम, आकर्षक रंगसंगती, रेशीम आणि जर यांच्या अद्भुत मिलाफातून घडणारे हे महावस्त्र लहानपणी माझ्या आजीची पैठणी म्हणून माझ्या आयुष्यात आले आणि तिच्या सौंदर्याने, हजारो वर्षांच्या इतिहासाने मला भारावून टाकले. म्हणूनच मी अस्सल पैठणीचा वारसा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी, मराठी मातीतील समृद्ध कलेचा वारसा पुढे नेण्यासाठी माझा केवळ पैठणीचा ब्रँड विकसित केला आणि अस्सल पैठणी विक्रीच्या व्यवसायात पाऊल टाकले.