

Paneer Biryani
esakal
साहित्य
दोन कप बासमती तांदूळ, अर्धा किलो पनीर, अर्धा कप काजूची पेस्ट, १ मोठ्या आकाराचा कांदा (उभा पातळ चिरून), १ मोठ्या आकाराचा कांदा (बारीक चिरून), ८ बदाम, २ टेबलस्पून लोणी, ३ टेबलस्पून तूप, पाऊण कप टोमॅटो प्युरी, २ हिरव्या मिरच्या (चिरून), २ टेबलस्पून आले (कुटून), ५ लसणाच्या पाकळ्या, १ टेबलस्पून पुदिना, पाऊण टीस्पून हळद, १ टेबलस्पून धने पूड, २ तुकडे दालचिनी, १ टेबलस्पून कोथिंबीर, अर्धा टीस्पून वेलची पूड, १ टीस्पून तंदुरी मसाला, २ मसाला वेलदोडे, ५ हिरवे वेलदोडे, पाव टीस्पून काळे मिरे पूड, चवीनुसार मीठ.
कृती
आपण रोज जसा भात करतो, तसा कुकरमध्ये भात शिजवून घ्यावा आणि भात बाजूला काढून ठेवावा. (काही वेळेस उरलेल्या भाताचीही अशा प्रकारची पनीर बिर्याणी करता येऊ शकते.) एक मोठा कांदा उभा पातळ चिरावा, दुसरा कांदा बारीक चिरून घ्यावा. एका कढईमध्ये तेल व तूप गरम करून त्यामध्ये पनीरचे तुकडे सोनेरी रंगावर तळून बाजूला ठेवावेत. त्याच कढईमध्ये उभा चिरलेला कांदा सोनेरी रंगावर छान तळून घ्या. आता त्याच कढईमध्ये लवंग, दालचिनी, वेलदोडे, काळी मिरपूड घालून तीस सेकंद परतून घ्यावे. आता त्यामध्ये आले-लसूण, बारीक चिरलेला कांदा व हिरवी मिरची घालून दोन ते तीन मिनिटे मध्यम आचेवर परतून घ्यावे. त्यामध्ये तंदुरी मसाला, हळद, वेलची पूड हे सर्व एकत्रित करून त्यामध्ये टोमॅटो प्युरी घालावी व ५ मिनिटे मंद विस्तवावर परतून घ्यावे. मग काजूची पेस्ट आणि चवीनुसार मीठ घालून मिक्स करून घ्यावे. मिश्रण चांगले परतून झाले, की त्यामध्ये पनीरचे तुकडे घालून १० मिनिटे मंद आचेवर शिजवून गॅस बंद करावा.
आता एक मोठ्या आकाराचे जाड बुडाचे भांडे घेऊन मंद आचेवर ठेवावे. शिजवलेल्या भाताचे तीन भाग करावेत व पनीरच्या मिश्रणाचे दोन भाग करावेत. भाताचा एक भाग भांड्यात एकसारखा पसरून त्यावर पनीरचा एक भाग, त्यावर भात, त्यावर पनीर आणि त्यावर परत भाताचा एक भाग पसरावा. त्यावर तळलेला कांदा, कोथिंबीर व पुदिना घालून झाकण ठेवून १५ मिनिटे मंद आचेवर चांगली वाफ येईपर्यंत ठेवावे. तळलेला कांदा व थोडीशी कोथिंबीर घालून सजवून गरमागरम पनीर बिर्याणी सर्व्ह करावी.