पार्थ खाडिलकरआयुष्याच्या प्रत्येक वळणावर आपल्याला भेटणारे लोक आणि अगदी प्राणी-पक्षीही आपल्या जगण्याशी काहीतरी अनुबंध जोडत असतात. पाळीव प्राणी/पक्षी काहीही असोत, ते आपल्याला लळा लावतात हे मात्र त्रिवार सत्य आहे. .सुदैवाने शहरीकरण न झालेल्या आणि खेड्याचे बांधलेपण जपून ठेवलेल्या एका आटपाट गावात माझे बालपण गेले. इथले ऋतू स्वतःचे ठसठशीत वेगळेपण दाखवणारे, इथला निसर्ग रंग आणि आवाजांची जादू उलगडून दाखवणारा आणि इथले खेळ शेणामातीशी जोडून ठेवणारे असे होते. या सगळ्या जगण्यात माणसाइतकेच स्थान होते ते पाळीव प्राण्यांना. एकंदरीत आपल्याकडील सगळीच गावे जीवसृष्टीशी नाते सांगणारी. रोजच्या नैवेद्यबरोबर गोग्रास बाजूला काढून ठेवणारी किंवा गाय व्यायल्यानंतर तिला गोडधोड म्हणून बाजरीचा खिचडा खाऊ घालणारी आपली संस्कृती. मुळात कुणाही माणसाला काहीशा सहवासानंतर, संपर्कानंतर समोरच्या व्यक्तीबद्दल, प्राण्याबद्दल आपसूकच एक स्नेह निर्माण होत असतो. आता आपल्या पाळीव प्राण्यांचेच बघा ना... ठरावीक काळानंतर तो जीव आपल्या घराचा एक सदस्यच होऊन बसतो. अगदी हक्काचा..! असाच एक ‘पेट’ साधारण आठ-नऊ वर्षांपूर्वी अनाहुतासारखा आमच्या घरी आला आणि घरचाच झाला..तर झाले असे, की आमच्या गावाबाहेर ओढ्याकाठी माजलेल्या गायरानात मोठमोठ्या वड-पिंपरणीच्या झाडांवर खूप पक्षी राहायचे. यातल्याच एका झाडात पोपटाची पिल्ले होती. नुकतेच पंख फुटून उडायला शिकलेले एक पिल्लू एक दिवशी पतंगाच्या मांज्यात अडकून खाली पडले. त्याला बरीच दुखापत झाली. हे पिल्लू तिथेच सोडून येणे प्रशस्त वाटले नाही म्हणून माझ्या गुराखी मित्रांनी ते आमच्या घरी आणून दिले. काही दिवसांनी त्या पोपटाच्या पिल्लाची जखम बरी झाली, ते व्यवस्थित खाऊ-पिऊ लागले, घरभर फिरू लागले म्हणून आम्ही त्याला परत त्याच्या ठिकाणी सोडले. पण त्याच्या इतर ज्ञातीबांधवांनी त्याच्यावर हल्ला केला आणि त्यात हा बिचारा एकाक्ष झाला. मग मात्र त्याला घरी आणण्यावाचून दुसरा पर्याय नव्हता. रीतसर पिंजरा वगैरे आणून हा रेस्क्यू केलेला ‘पोप्या’ आमच्या घराचा अधिकृत सदस्य झाला. इवलुसा मुठीएवढा त्या पक्ष्याचा देह, किंचित पोपटी किंवा पिस्ता रंग, हलक्या तांबड्या रंगाची आकडेदार चोच, भविष्यात मानेभोवती गडद काळ्या रंगात रंगणारा हलक्या शेडचा कंठ आणि नुकतेच आपल्या बोटावर घट्ट पकड बसेल असे त्याचे पंजे हे असे एकंदरीत त्याचे सुरुवातीचे रूपडे..जसजसा हा नाजूक जीव आमच्या भरल्या घरात मोठा होऊ लागला, तसा त्याचा बुजरेपणा जाऊन तो आमच्यावर हक्क दाखवू लागला आणि आम्हालाही आमच्यातल्या त्याच्या कर्कश्श लुडबुडीची गोड सवय होऊन गेली. सुरुवातीला चिमटीतून भिजवलेली डाळ किंवा मटारचे दाणे खाणारा पोप्या आता चहापासून वरण-भातापर्यंत सगळ्या पदार्थांवर ताव मारायला शिकलाय. तरीही त्यातल्यात्यात त्याचे आवडते पदार्थ म्हणजे हिरवी, जून मिरची आणि फोडी न केलेला पेरू. बीजधारणा करणाऱ्या सगळ्या फळभाज्या आणि फळे त्याला शक्यतो आवडतात. कारण पठ्ठ्याला ते फळ पायात धरून चोचीने सोलायचे असते आणि बिया खाण्यात जास्त इंटरेस्ट असतो. बरं ही खादाडी करताना अगम्य आणि अतार्किक भाषेत त्या फळाशी, पोळीच्या तुकड्याची किंवा खडीसाखरेच्या खड्याशी अगदी मन लावून संवादही करायचा असतो. जर एखादी गोष्ट आवडीची नसेल किंवा भांड्यातले पाणी संपले असेल, तर आमचे पोपटराव आख्खे घर डोक्यावर घेतात. सगळ्या सजीवसृष्टीचा जीवनव्यवहारच पोटाभोवती फिरतो... हा पोपट तरी त्याला कसा अपवाद असणार?.‘पोपटपंची करणे’ किंवा ‘पोपटासारखे बोलणे’ वगैरे वाक्प्रचार आपण सारखे वापरतो, पण पोपटासारखे गोड आणि शिकवल्याबरहुकुम बोलणे अगदी कुणालाही शक्य नाही, असे माझे ठाम मत आहे. कारण पोपटपंची करायला जी लहान बाळाची निरागसता लागते, ती आपल्यासारख्या पढतमूर्ख माणसाला जमणारी नाही. ‘मिठुमिया’, ‘काय करतोयस’, ‘गप्प बैस’ असे शब्द आणि मांजराचा, कावळ्यांचा, अंगणात बांधलेल्या बंड्या कुत्र्याचा आवाज हुबेहूब नकलणे हे ह्या राव्याचे कसब. बाहेरून कुणी नवखा माणूस आला, तर मात्र हे साहेब बुजरेपणाने तोंड उघडत नाहीत आणि कधी चुकून रात्री उशिरापर्यंत गप्पा रंगल्या, टीव्ही सुरू राहिला, तर सगळ्या घराचे दिवे बंद केल्याशिवाय हे ओरडणे थांबवत नाहीत. पोप्याने घरात आल्यापासून आमच्या रूटीनमध्ये चैतन्य भरले आहे हे मात्र मान्य करायला हवे..आयुष्याच्या प्रत्येक वळणावर आपल्याला भेटणारे लोक आणि अगदी प्राणी-पक्षीही आपल्या जगण्याशी काहीतरी अनुबंध जोडत असतात. काही तत्त्वज्ञ असे मानतात, की अशा जीवसृष्टीचे भेटणे आपल्या पूर्वजन्मीचे संचित असते. अगदीच तात्त्विक गोष्टींमध्ये न पडताही या गोष्टीशी आपण रिलेट करू शकतो. घरात पायात पायात करणारी आणि आर्त स्वरात ‘भिक्षां देही’ म्हणणारी मांजरे असोत किंवा काहीतरी नवा उपद्व्याप करून ठेवणारा कुत्रा आणि अगदीच हे दोन प्राणी ज्यांना कॉमन वाटतात त्यांच्याकडचे फिशपाँड, लव्ह बर्ड्ससारखे पेट्स किंवा आमच्या घरात अनाहूतपणे आलेला आणि आमच्या मनात घर केलेला रावा... पाळीव प्राणी/पक्षी काहीही असोत, ते आपल्याला लळा लावतात हे मात्र त्रिवार सत्य आहे.(पार्थ खाडिलकर राजगुरुनगरस्थित हुतात्मा राजगुरू महाविद्यालयात मराठी विषयाचे अध्यापक आहेत.).सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.