संजीवनी प्रभू
पाळीव प्राणी आपली आयुष्यभर सोबत करू शकत नसले, तरी ते आपलं सारं आयुष्य कायमस्वरूपी व्यापतात. आपलं जीवन परिपूर्ण करतात. हे जाणणारे पालक पाळीव प्राण्यांना कुटुंबाचाच एक सदस्य मानतात. त्यामुळे पाळीव प्राण्यांच्या देखभालीवर खर्च करण्याचं प्रमाण दिवसेंदिवस वाढतंय.
पेट ग्रूमिंग उद्योगामध्ये सध्या लक्षणीय वाढ दिसत आहे, ती त्यामुळेच. या वाढीला हातभार लावणारा सगळ्यात मोठा घटक म्हणजे पेट पालकांची वाढती संख्या. विशेषतः मिलेनियल्स आणि जेन-झी या पिढीतले लोक मोठ्या प्रमाणात पाळीव प्राणी दत्तक घेऊ लागले आहेत. हे लोक त्यांच्या पाळीव प्राण्यांच्या आरोग्यासोबतच त्यांच्या ग्रूमिंगसाठीही आग्रही आहेत.
कोविड महासाथीच्या काळात पाळीव प्राणी दत्तक घेण्याचं प्रमाण वाढलं, त्यामुळे ग्रूमिंग सेवांची मागणीही वाढली. यामुळे पेट ग्रूमिंग उद्योग आपला आलेख चढताच ठेवेल अशी अपेक्षा आहे. पाळीव प्राण्यांचे पालक सतत सोयीस्कर, उच्च-गुणवत्तेच्या आणि पर्सनलाइझ्ड ग्रूमिंग सुविधांच्या शोधात असतात. त्यांना लक्झरी सेवा हव्या असतात, आणि त्यामुळे ग्रूमिंग इंटस्ट्रीला उज्ज्वल भविष्य आहे असं वाटतं.