
अनुराधा प्रशांत सिरसमकर
निसर्गानं त्याचे विविध रंग दाखवायला सुरुवात केली होती. सगळीकडे छान हिरवळ, अधेमधे छोटीछोटी फुलं उगवलेली, मधूनमधून जी गावं लागत होती त्यातली घरंसुद्धा एकसारखी लालचुटूक, कौलारू... त्यामुळे हा प्रवास संपूच नये असं वाटत होतं. अखेर आम्ही आलो निळ्याशार अथांग पाण्याकाठी... ब्लेड लेकपाशी.
मी बँकेच्या नोकरीतून ऐच्छिक रिटायरमेंट घेतल्यापासून आम्ही ठरवून वर्षातून दोन-तीन ट्रिपा करतोच आहोत. आम्हा दोघांनाही फिरायची अतिशय आवड; त्यामुळे एक ट्रिप सुरू असतानाच आता पुढची ट्रिप कुठे याचं प्लॅनिंग सुरू होतं.
जोपर्यंत शरीरात ताकद आहे, पायात दम आहे, तोपर्यंत फिरून घ्यावं... पुढे आवड असूनही फिरता नाही आलं तर? त्यामुळे जमेल तितकं जग बघून घ्यावं असा विचार करून युरोपची टूर झाली होती आणि स्कँडेनेव्हियाही बघून झालं होतं.