Nepal crisis
Esakal
योगेश परळे
चीनचा अपवाद वगळता भारताच्या शेजारी देशांमध्ये मोठ्या प्रमाणात राजकीय अस्थिरता तयार झाली आहे. या अस्थिरतेने भारतासमोर नवी आव्हाने निर्माण केली आहेत. या देशांमधील पडसाद भारतामध्ये उमटून येथील व्यवस्थेस धोका निर्माण होऊ न देण्याबरोबरच या देशांमध्येही भारतविरोधी ‘नॅरेटिव्ह’ तयार होऊ नये, यासाठी भारताला प्रयत्नशील राहावे लागेल.
गेल्या दशकभरातील जागतिक राजकारणाची स्थिती आणि गती पाहता, राजकीय व्यवस्थेसंदर्भातील शक्यतांचा एखादा ‘पँडोरा बॉक्स’ अचानक उघडला गेल्याचे भासू लागले आहे! या कालावधीत जागतिक भूराजकीय परिस्थितीचा प्रवास अचानक चित्राकडून चलचित्राकडे झाल्यासारख्या गोष्टी झपाट्याने घडू व बदलू लागल्या आहेत. नेपाळमधील राजकीय अराजक म्हणजे याच मालिकेमधील नवा अध्याय म्हणावा लागेल.
जगभरातील तरुणांमध्ये अत्यंत लोकप्रिय असलेल्या फेसबुक, एक्स, इन्स्टाग्राम अशा समाजमाध्यमांनी सरकारने नेमून दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन न केल्याचा ठपका ठेवत नेपाळमधील सरकारने या संकेतस्थळांवर बंदी आणली. या पार्श्वभूमीवर होत असलेल्या आंदोलनावेळी सरकारच्या गोळीबारात वीसपेक्षा अधिक आंदोलक ठार झाल्याने या व्यवस्थाविरोधी असंतोषाच्या ठिणगीचे रूपांतर अचानक वडवानलात झाले. यानिमित्ताने नेपाळमध्ये गेल्या काही वर्षांपासून सुप्तावस्थेत असलेल्या राजकीय व्यवस्थेविरोधातील नैराश्याचा भडका उडाला आणि त्याने येथील संसद, न्यायव्यवस्थेसहित महत्त्वपूर्ण आस्थापनांचाच घास घेतला.