डॉ. कांचनगंगा गंधे, अशोक कुमार सिंग
फुलांचं उमलणं आणि त्यातून सुगंध पसरवणं ही दैनिक लयबद्धता आहे. ती नैसर्गिक लय आहे. सूर्याचं आणि फुलांचं एक अतूट नातं आहे. सूर्योदयाच्या सुमारास वातावरणात पाकळ्यांमधून सुगंध पसरायला सुरुवात होते आणि थोड्याच काळात आसमंत सुगंधी, शुद्ध, आल्हाददायक होतो... किडे, मधमाश्याही फुलांकडे आकर्षिल्या जातात.
भाद्रपद विनायक चतुर्थीला ‘विश्वकर्मा’ गणेशाची विधीपूर्वक स्थापना करून त्याची दहा दिवस पूजा करण्याची प्रथा आपल्या संस्कृतीत पूर्वसूरींनी सुरू केली. गणेशाची भक्तिभावाने, आदरपूर्वक केलेली पूजा म्हणजे प्रकृतिप्रति, निसर्गाप्रति केलेली पूजा. ह्या शक्तीला सुवासिक फुले, पत्री, फळं आणि जल श्रद्धापूर्वक अर्पण करण्याची प्रथाही हिंदू संस्कृतीत आहे. ह्या पूजेची महती भगवान श्रीकृष्णाने भगवद्गीतेच्या नवव्या अध्यायातल्या चोविसाव्या श्लोकात सांगितली आहे.
पत्र पुष्पं फलं तोयं यो मे भक्त्या प्रयच्छति ।
तदहं भक्त्युपहृतमश्नामि प्रयतात्मनः ॥