

Portfolio Rebalancing
esakal
भूषण महाजन
आपल्या गुंतवणुकीच्या भांडारात मात्र अधूनमधून खांदेपालट होणे आवश्यक आहे. सहसा पोर्टफोलिओ बांधताना आज दुर्लक्षित, पण बाजाराला न कळलेले उत्तम मूल्य असलेले (व्हॅल्यू स्टॉक्स) असावेत. पण असे शेअर वर जाण्यास योग्य वेळ यावी लागते. त्यासाठी मोठा संयम, दूरदृष्टी व धीर हवा असतो.
खांदेपालट ही संज्ञा राजकारणात मंत्रिमंडळातील फेरबदल करताना वापरली जाते, क्वचित प्रसंगी खेळातदेखील! वैभव सूर्यवंशीला संघात घ्यायचे असेल, तर कोणाला काढावे, याबद्दल क्रीडा रसिकांची स्वयंघोषित निवड समिती लगेच निर्णय घेऊन टाकते. अर्थमंत्री कोण असावे, याबद्दलही शेअर रसिकांचे स्वतंत्र मत आहे. बाजारात मार खाल्लेल्या बऱ्याच पंटर्सना, विद्यमान अर्थमंत्र्यांना महिला व बालविकास किंवा कुटुंबकल्याणसारखे एखादे ‘जबाबदारीचे व आव्हानात्मक’ खाते द्यावे असे वाटते. किमान चिदंबरम यांना पक्षात घेऊन कॅपिटल मार्केटची जिम्मेदारी द्यावी असेही वाटते. अर्थात विद्यमान मंत्री अर्थखात्याची जबाबदारी अत्यंत सक्षमपणे हाताळत असताना हा बदल कदापिही होणार नाही. कारण जोपर्यंत कंपनी कामकाज सुधारत नाही, बाजाराचे मूल्यांकन आकर्षक होत नाही, परदेशी गुंतवणूक संस्था आपल्याला हव्यात का नकोत हे ठरत नाही, तोपर्यंत शेअर बाजाराची दयनीय अवस्था कशी संपेल? केवळ अर्थमंत्र्यांना कसा दोष द्यायचा? पण विशफुल थिंकिंगला काय हरकत आहे? असो.