
ॲड. रोहित एरंडे
आघाडीची अभिनेत्री असलेल्या दीपिका पदुकोणने ‘प्लॅन्ड सीझर’ का केले इथपासून तिची नॉर्मल डिलिव्हरीच कशी व्हायला पाहिजे होती अशी चर्चा इंटरनेटवर अलीकडे रंगली होती. असाच प्रकार एक मराठी अभिनेता आणि अभिनेत्रीच्या बाबतीत घडला. त्यांच्या लग्नाला दहा वर्षे होऊनही अजून पाळणा कसा हलला नाही म्हणून त्या अभिनेत्रीला ट्रोल व्हावे लागले. याला आपल्या संस्कृतीमधील विरोधाभास म्हणावा लागेल. कारण एकीकडे महिला दिनाचे कौतुक करायचे किंवा नवरात्रामध्ये देवीचे रूप म्हणून उदो उदो करायचा आणि दुसरीकडे महिलांनी मूल जन्माला घालायचे की नाही आणि मुलाला जन्म द्यायचे ठरले तर प्रसूती कुठल्या पद्धतीने व्हावी, यावर आपला काहीही संबंध नसताना पु.लं. म्हणायचे तसे ‘मत ठोकून द्यायचे’ असे प्रकार दिसून येतात.