प्रा. डॉ. विनोद शिंपले
भारतात वनसंपदा संवर्धनासाठी अगदी प्राचीन काळापासूनच प्रयत्न केले गेले आहेत. त्यापैकी देवराई ही निसर्ग संवर्धनाची एक पारंपरिक पद्धत आपल्या पूर्वजांकडून अमलात आणली गेली. अगदी अथर्ववेदामध्येसुद्धा वनस्पतींचे आणि विशेषतः औषधी वनस्पतींचे महत्त्व नमूद करण्यात आले आहे.
ओषधीः पृथिवीमाता दिवं च प्रथयन्त्युत।
तासामोजः प्राणं विश्वं जीवत्यनुपश्यतः॥
(अथर्ववेद ः ८.७.१०)
पारंपरिक श्रद्धांमुळे आरक्षित राहिलेले अरण्य म्हणजेच देवराई. देवासाठी संरक्षित राई (जंगल/ वन) हा साधा सरळ अर्थ. देवरायांवर प्राचीन वाङ्मयापासून आजपर्यंत खूप लिहिलं-बोललं गेलं आहे, अगदी अलीकडचा कांतारासारखा चित्रपटही निसर्ग हाच परमेश्वर या कल्पनेभोवती फिरतो.