राजेन्द्र बनहट्टी
१६ जानेवारी १९४१च्या रात्री घर सोडताना नेताजींनी त्या घरात केलेल्या शेवटच्या भोजनाची थाळी आणि वाटी, आझाद हिंद सेनेसाठी निधी गोळा करण्यासाठी लिलाव केलेले स्वतःच्या गळ्यातील हार, ‘तुम मुझे खून दो, मैं तुम्हे आझादी दूँगा ही घोषणा करताना घातलेला आझाद हिंद सेनेच्या सरसेनापतीचा गणवेश अशा अगणित रोमहर्षक वस्तूंचा समावेश नेताजी संग्रहालयात आहे.
‘नेताजी भवन, ३८-२ एल्जिन रोड’ हा नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या कोलकत्यातील घराचा पत्ता आहे. आता एल्जिन रोडचे लाला लजपतराय सारणी असे नामकरण झाले आहे. पण नेताजी भवनाचा पत्ता केवळ कोलकत्यातच नव्हे, तर अवघ्या पश्चिम बंगालमध्ये सर्वज्ञात आहे.
टॅक्सीचालकाला त्यादिवशी आम्ही कुठलीही सूचना दिली नव्हती, तरी फक्त ‘नेताजी भवन’ हे दोन शब्द उच्चारताच त्याने आम्हाला नेताजींच्या घरापाशी आणून सोडलं. (इथे आम्ही म्हणजे स्वतःला अहो-जाहो केलेलं नाही! मी ज्येष्ठ नागरिक असल्यामुळे मुलगा चैतन्य आणि सून प्रीती यांच्या प्रेमळ आणि दक्ष निगराणीखाली कोलकत्याचा प्रवास करत होतो.)