

Puppy Care During the First Year
esakal
डॉ. राजशेखर दडके
केवळ योग्य ज्ञानाचा अभाव, आपल्या काळजी घेण्यात झालेली कमतरता आणि इतर काही कारणांमुळे श्वान अल्पायुषी ठरू शकतात. वेळच्यावेळी पशुवैद्यकाकडे नेणं, पिल्लाच्या आरोग्याची काळजी घेणं हे इतर कर्तव्यांइतकंच महत्त्वाचं असायला हवं.
श्वान, अर्थात इमानदार प्राणी कुत्रा म्हणजे सर्वांना हवाहवासा वाटणारा, सुरक्षा देणारा सोबती; माणसाळलेला, आपल्याशी एकरूप होणारा, जीवाला जीव लावणारा प्राणी. आपण शेजाऱ्यांचं पाहून, टीव्हीवर पाहून, मित्राकडे पाहून किंवा बालहट्ट पुरवावा म्हणून विशिष्ट जातीचं छान पिल्लू घेण्याचा निर्णय घेतो आणि मग सुरू होते घरातल्या सदस्यांमध्ये चर्चा. कुत्र्यांपासून होणाऱ्या रोगांचं काय, असा प्रश्न बाबांना पडतो. आईला मुलांच्या अभ्यासाची आणि त्या कुत्र्याच्या पिल्लाला फिरवायला कोण नेणार याची चिंता असते. मात्र बालहट्ट पराकोटीला जातो, अन् इच्छे-अनिच्छेने श्वानाच्या पिल्लाचा गृहप्रवेश होतो!
या गृहप्रवेशानं घरातलं वातावरणच बदलून जातं. अत्यंत आनंदी व सकारात्मक विचारांनी घर भरून जातं. हळूहळू आजी-आजोबाही हसून नवीन पिल्लाचं कौतुक करू लागतात. त्या पिल्लाची दुडूदुडू धावपळ, टुणटुण उड्या, आनंदानं बागडणं पाहून घरातले सगळेच आनंदी होतात.