

10 Minute Delivery Business
esakal
डॉ. प्रज्ज्वल - प्रफुलराव वडेट्टीवार
क्विक कॉमर्स ही केवळ दहा मिनिटांत वस्तू पोहोचवणारी प्रणाली नाही, ती भारतातल्या बदलत्या जीवनशैलीचं प्रतीक आहे. मात्र कोणत्याही नव्या व्यवसायाचं यश हे तंत्रज्ञानाइतकंच स्थानिक अर्थव्यवस्था, इकोसिस्टीम ग्राहकांच्या गरजा आणि त्या भागातल्या परिस्थितीवरही अवलंबून असतं. या तिन्ही गोष्टींचा योग्य मेळ साधता आला, तर भविष्यात छोट्या शहरांमध्ये आणि गावांमध्येही क्विक कॉमर्सचा अधिकाधिक विस्तार होऊ शकतो.
‘‘चिं टू, तेलाची बाटली संपली आहे... जरा दुकानात जाऊन आणशील का?’’ आईनं स्वयंपाकघरातून मोठ्यानं विचारलं.
‘‘अगं आई, काळजी करू नकोस. दुकानात जायची गरज नाही. आत्ताच ऑर्डर करतो. तुझा चहा उकळून होईपर्यंत तेलाची बाटली घरी येईल, बघ!’’ चिंटू हसत म्हणाला.
आईनं त्याच्याकडे अविश्वासानं पाहिलं. ‘‘अरे, दुकानात जाऊन यायलाच दहा मिनिटांपेक्षा जास्त वेळ लागतो. एवढ्या लवकर कसं काय येणार?’’ ती म्हणाली. अवघ्या काही मिनिटांतच बेल वाजली. दारात डिलिव्हरी पार्टनर उभा होता आणि चिंटूनं मागवलेली तेलाची बाटली त्याच्या हातात होती. आईच्या चेहऱ्यावर आश्चर्य स्पष्ट दिसत होतं.
‘‘खरंच किती पटकन आली!’’ ती नकळत म्हणाली.
आजकाल हे असे प्रसंग शहरी व निमशहरी भागांतल्या बऱ्याच घरांमध्ये ऐकायला मिळतात. हे शक्य झालंय क्विक कॉमर्स वेबसाइट्समुळे.
‘Get your favourite products delivered in 10 minutes.’ अशा आकर्षक घोषणा करणारे क्विक कॉमर्स प्लॅटफॉर्म्स आज अनेकांच्या दैनंदिन आयुष्याचा भाग झाले आहेत. किराणा सामान, ठरावीक औषधं इथपासून मोबाईलचा चार्जर, अगदी सोन्याची नाणीही आता काही मिनिटांत घरपोच मिळू लागली आहेत. अशावेळी प्रश्न पडतो, की क्विक कॉमर्सच्या या यशामागचं रहस्य काय?