

Rain and Umbrella
esakal
श्रुती भागवत
पाऊस आणि छत्री यांचं नातं म्हणजे सतत भांडणाऱ्या, पण सोबत राहण्याशिवाय गत्यंतर नसणाऱ्या दोन माणसांसारखं आहे. पाऊस पडला की छत्रीची गरज भासते आणि छत्री घेतली की पाऊस जरा जास्तच उत्साहात पडतो, असं मला वाटतं. जणू काही पाऊस म्हणत असावा, ‘या मुलीला भिजवतोच’ आणि छत्री म्हणत असावी, ‘जमेल तितकं वाचवते बाई हिला’. या दोघांच्या भांडणात माझी मात्र पंचाईत होते.
पावसाळा सुरू झाला, की काही लोकांचा चेहरा खुलतो. ‘अरे व्वा! पाऊस आला!’ असं म्हणत ते पहिल्या सरींचा आनंद घेतात. काहीजण पहिल्या पावसात मुद्दाम बाहेर जाऊन भिजतात. गरमागरम चहा, कांदा भजीचा आस्वाद घेणं, खिडकीत बसून पाऊस बघणं, मातीचा दरवळ अनुभवणं, पावसाची गाणी ऐकणं; एवढंच काय तर विकएंडला लाँग ड्राइव्हला जाण्याचे, धबधब्याखाली भिजण्याचे, ट्रेक्स करण्याचे आणि पावसात फोटो काढण्याचे प्लॅन्सही लगेच ठरतात. पावसाळा म्हणजे त्यांच्यासाठी एक उत्सवच असतो. वातावरणातला गारवा, सगळीकडे पसरलेला हिरवागार निसर्ग आणि रिमझिम सरी पाहून ते हरखून जातात. आणि मी?? मी मात्र खिडकीतून बाहेर बघत मनात म्हणते, ‘झाला का हा सुरू! परत पाणी, परत चिखल!’ मुळात मला पाऊस फारसा आवडत नाही. पावसाच्या कविता, गाणी, गरम भजी, चहा, धुकं, रोमँटिक वातावरण हे सगळं इतरांसाठी असेल; माझ्यासाठी पाऊस म्हणजे ओले आणि न वाळणारे कपडे, चिखल, ट्रॅफिक, न सुकणाऱ्या चपला आणि सोबत वागवावी लागणारी ‘छत्री’!
छत्रीचं आणि माझं नातं तसं विचित्रच आहे. वर्षभर तिची आठवणही येत नाही. पण पावसाळा सुरू झाला, की तिच्याशिवाय बाहेर पडण्याची हिंमत होत नाही. माझी छत्री दिसायला अगदी छान. दुकानात पाहताक्षणीच ठरवलं, हीच घ्यायची. रंग छान, आकारही मला हवा तेवढाच - भलीमोठी नाही, फार टिचकीही नाही. पण वापरायला सुरुवात केली आणि मग कळलं, की छत्रीचं सौंदर्य आणि तिचा उपयोग यांचा काही संबंध नसतो. वारा आला, की ती उलटी होतेच. घाईच्यावेळी ती लवकर बंद होत नाही आणि झालीच तर त्यात बोटं अडकतात. उघडताना आजूबाजूच्या लोकांना आधी सावध करावं लागतं. दुसऱ्यांच्या छत्र्या बघून आपल्यालाही सावध व्हावं लागतं.