Monsoon Fashion : रेनी फॅब्रिक अन् शेड

पावसाळ्यामध्ये कॉटनसह इतर काही प्रकारचे फॅब्रिक बिनधास्तपणे वापरू शकता.
Rainy fabrics and shades
Rainy fabrics and shades saptahik
Updated on

सोनिया उपासनी

पावसाळ्यामध्ये कॉटनसह इतर काही प्रकारचे फॅब्रिक बिनधास्तपणे वापरू शकता. आर्द्रता शोषून न घेणारे, पटकन वाळणारे आणि वजनाला हलके असे कापडांचे प्रकार पावसाळ्यात वापरावेत. त्याचप्रमाणे पावसाळा म्हणजे काळे, करडे, मातकट कपडे घालायचे असा गैरसमज असतो. पण आपले व्यक्तिमत्त्व खुलवणारे इतरही अनेक रंग आहेत.

पावसाची वाट सर्वच लोक आतुरतेने बघतात. चराचराला नवसंजीवनी देण्यासाठी आणि वर्षभर पाणी मिळण्यासाठी मॉन्सून सीझनमध्ये भरपूर पावसाची आवश्यकता असते. म्हणूनच पाऊस सगळ्यांच्याच जिव्हाळ्याचा विषय असतो.

पावसावर अनंत गाणी आणि कविताही लिहिल्या जातात. पण याच पावसात जेव्हा कामावर जायची वेळ येते, तेव्हा तो काही जणांसाठी त्रासदायकही ठरतो. पावसाळ्यातील कमी-जास्त होणारे तापमान आणि कमी-जास्त होणारी आर्द्रता जाचक ठरते. कधी अतिवृष्टी, तर कधी अल्प प्रमाणात रिमझिम... हा खेळ पूर्ण पावसाळाभर सुरूच असतो.

हवेतील वाढत्या आर्द्रतेमुळे कपडे सुकत नाहीत, अगदी वॉशिंग मशिनमधून पिळून काढले तरी. काही प्रकारच्या कापडांचे तर वैशिष्ट्यच असते- सुकल्यानंतर ही कापडे हवेतील आर्द्रता शोषून घेतात व परिणामी अधिक ओलसर होत जातात. ही आर्द्रता अनेक जीवाणू व विषाणूंच्या वाढीसाठी पोषक ठरते.

यामुळेच पावसाळ्यात अनेकांना फंगल इन्फेक्शनचा सामना करावा लागतो. अधिकच्या आर्द्रतेमुळे त्वचा कायमच ओलसर जाणवते. त्यात आपण घातलेले कपडेही जर आर्द्रता शोषून घेणारे असतील, तर आपल्याही फंगल इन्फेक्शनचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे कुठल्या प्रकारचे कापड आपण दीर्घकाळासाठी वापरू शकतो हे लक्षात घ्यायला हवे.

ओलसर कपडे अंगावर राहिल्यामुळे पुरळ येणे, खाज येणे हे अगदी कॉमन झाले आहे. त्यामुळेच दमट हवामानात घालण्यासाठी सुती कपडे, अर्थात ‘कॉटन फॅब्रिक’ हा सर्वोत्तम पर्याय आहे. कॉटनचे कापड त्वचेच्या आजूबाजूला हवा खेळती ठेवते आणि त्वचेचा ओलावा शोषून त्वचेला कोरडी व थंड ठेवते.

कॉटनशिवाय इतर काही प्रकारचे फॅब्रिक पावसाळ्यात बिनधास्तपणे वापरू शकता. यामध्ये मल कॉटन, रेयॉन व हलक्या वजनाचे रेशमी कापड ह्यांचा समावेश आहे. डेनिममध्येही थोडे पातळ व वजनाला हलके कापड उपलब्ध आहे. पावसाळ्यासाठी हे कापडही योग्य पर्याय ठरू शकते.

जर भर पावसात बाहेर जाण्याशिवाय पर्याय नसेल, तर अशा वेळी तुमची त्वचा दीर्घकाळासाठी कोरडी ठेवू शकेल म्हणजे जास्त दमटपणा शोषून घेणार नाही, आणि भिजलेच तर झटपट सुकेल अशा कापडाचा प्रकार निवडायला हवा.

यासाठी नायलॉन हा एक टिकाऊ पर्याय आहे. हे वजनाला हलके असते व कापड झटपट सुकते. स्पॅडेक्सचे कापड, ज्याला ईलास्टेन अथवा लायक्रा म्हणूनही ओळखले जाते, ते हवा खेळती राहायला मदत करते आणि ओले झाल्यास पटकन वाळते. या सर्व पर्यायांबरोबर अजून एक पर्याय म्हणजे जॉर्जेट. हेसुद्धा पटकन सुकणारे आणि वजनाला अतिशय हलके असते.

वर दिलेल्या पर्यायांमधून प्रत्येकांनी आपला कम्फर्ट बघून त्यानुसार कपड्यांची निवड करावी. दमट वातावरणात सर्वात महत्त्वाचे असते ते आरामदायी कपडे निवडणे.

हे झाले कापडाच्या प्रकाराबद्दल! आता थोडे रंगसंगतीविषयी बोलूया. दमट वातावरणासाठी कुठल्या प्रकारच्या रंगसंगतीची आपण निवड करतो, याचेही जर थोडे भान ठेवले तर पावसाळ्यातही तुम्ही फॅशनेबल आणि चारचौघांत उठून दिसू शकता.

बाहेर पाण्याच्या धारा बरसत असताना, चोहीकडे चिखल व मातीचे पाणी असताना बाहेर जाताना कुठल्या रंगाचे कपडे घालायचे हा नेहमीच एक यक्षप्रश्न असतो. हलक्या रंगाचे अथवा पेस्टल कलर अथवा पांढऱ्या रंगाचे कपडे घालता येत नाहीत. कारण एक तर हे सर्व हलके रंग कमी-जास्त प्रमाणात पारदर्शी असतात, त्यामुळे भिजले तर पंचाईत होऊ शकते.

आणि दुसरे म्हणजे अशा कपड्यांवर माती अथवा चिखलाचे डाग पडले तर ते डाग घालवता घालवता नाकी नऊ येतात. त्यामुळे पावसाळा म्हणजे काळे, करडे, मातकट कपडे घालायचे असा समज असतो. पण हा गैरसमज आहे. आपले व्यक्तिमत्त्व खुलवणारे इतरही अनेक रंग आहेत.

सर्व प्रकारचे रंग सर्वांनाच चांगले दिसतील असे नाही, पण स्वतःच्या अंगकाठीचा आणि कॉम्प्लेक्शनचा थोडा विचार करून त्याप्रमाणे रंगांची निवड केली तर कुठल्याही प्रसंगी फॅशनेबल दिसता येते. ऑरेंज, पिवळा, निळा, गुलाबी, लाल, ब्रीक रेड, मार्सेला, ॲक्वामरीन हे रंग पावसाळ्यात खुलून दिसतात.

ऑरेंज : ऑरेंज शेड पावसाळी गार हवेत उबदारपणाचा भास निर्माण करतात. या रंगांचे कपडे घातल्यावर मनालाही आनंद वाटतो. थोडक्यात काय तर ऑरेंज शेड आल्हाददायक असतात.

पिवळा : पिवळा रंग पावसात नेहमीच तेजस्वी वाटतो. पिवळ्या रंगातही गडद आणि फिक्या छटा आहेत. पावसाळ्यात पिवळ्या रंगाच्या गडद शेड वापरल्या तर कापडावर पडलेले डाग सहसा दिसून येत नाहीत. शिवाय पिवळा रंग पाहणाऱ्यालाही प्रसन्न वाटतो.

निळा : पावसाळ्यात आकाशातले ढग राखाडी व काळ्या रंगाचे असतात. खुल्या आसमंताचा निरभ्र निळा रंग कुठेतरी हरवून जातो. त्यामुळे मग उगाचच उदासीन वाटते. म्हणून टवटवीतपणा आणण्यासाठी निळ्यातल्या शेड पावसाळ्यात वापरल्या तर प्रफुल्लित वाटेल.

गुलाबी : हलका गुलाबी रंग न वापरता जर गुलाबी रंगातील गडद छटा वापरली तर ढगाळ उदास वातावरणात वेगळीच चमक येते.

लाल : लाल रंगाचा वापर कुठल्याही पोशाखात मिक्स आणि मॅच करून वापरला तर उठून दिसतो. लाल रंगातील कुठल्याही शेड या सीझनमध्ये छानच दिसतात.

ॲक्वामरीन : ॲक्वामरीन रंग नेहमीच एक चैतन्य देऊन जातो. हा रंग शांत भासतो. तुम्ही रिलॅक्स मूडमध्ये असाल तर नक्कीच या रंगाचा वापर करा.

मार्सला : हा रंग ग्रे-ग्रीन अंडरटोन कलर आहे. पावसाळ्यातील पार्ट्यांमध्ये, फंक्शनमध्ये तुम्ही या रंगाच्या कपड्यांचा वापर करू शकता.

या रंगांशिवाय सर्व अर्दी शेड आहेत. या रंगांमधले जे रंग तुम्हाला कॅरी करायला सोपे वाटतात, त्या रंगाची निवड करा व पावसाळ्याची पुरेपुर मजा लुटा...!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.