साईराज घाटपांडे
संध्याकाळी गडावर पोहोचलो, तर तिथं चार-पाच सिनिअर सिटिझन चहा पित बसले होते. चहा प्यावा म्हणून तिथं बसलो. त्यांच्या गप्पा ऐकताना मजा येत होती. त्यांच्याशी बोलताना कळलं, की तिथं जिजा नावाची एक मुलगा होती, जी आमची जेवायची, राहायची सोय करू शकत होती. हे ऐकून सुटकेचा निश्वास सोडला. मंदिरात जाऊन पाया पडून आलो. तिथं चार्जिंग स्लॉटही दिसला. तिथं काहींशी बोलणं झालं, त्यांनी आम्हाला ‘कसे आलात’ असं विचारलं, आम्ही काहीच प्लॅन न करता आलोय म्हटल्यावर सगळे शॉक झाले.
काहीच न ठरवता झालेल्या राजगडाच्या सडन प्लॅनसाठी आम्ही सगळे पहाटे पाच वाजता स्वारगेट स्टँडवर आलो. रात्रभर झोप नव्हती. फक्त जायचं आहे हे पक्कं होतं. तिथूनच खरी मजा सुरू झाली. स्टँडवर पोहोचल्यावर कुठलीच गाडी तिथं थेट जात नाही असं समजलं. आमच्यासारखाच तिथंही कोणाचा कोणाला मेळ नव्हता. तासाभरानंतर कळलं की साडेआठची एक गाडी होती, पण अलीकडेच कुठेतरी उतरावं लागणार होतं.
आम्ही जरा विचार केला, पण जायचं पक्क ठरवलं असल्यामुळे थांबलो. आता जी गाडी येईल त्यात बसावं आणि तिथं जावं असं वाटत होतं. शेवटी साडेआठची गाडी नऊला आली. साडेअकराला मार्गासनी गावात उतरलो. राजगड तिथून आणखी सातेक किलोमीटर लांब आहे हे समजलं. मगर हौसले बुलंद थे! सहा ते सात किलोमीटर म्हणजे काहीच नाही असं म्हणून आम्ही चालत राहिलो. बघता येईल तेवढा गड बघायचा आणि उतरून लवकर परतायचं असं आम्ही ठरवलं आणि आमची पावलं राजगडाची वाट चालू लागली.