

Fasting Recipes
esakal
राजगिऱ्याच्या पुऱ्या
साहित्य
एक मोठी वाटी राजगिऱ्याचे पीठ, १ मध्यम आकाराचा उकडलेला बटाटा, अर्धा चमचा जिरेपूड, चवीनुसार लाल तिखट व मीठ, गरजेनुसार तूप.
कृती
राजगिऱ्याच्या पिठात कडकडीत तुपाचे चमचाभर मोहन घालावे. उकडलेल्या बटाट्याच्या किसामध्ये जिरेपूड, मीठ आणि पाणी घालून घट्टसर पीठ मळून घ्यावे व पंधरा मिनिटे झाकून ठेवावे. मग राजगिऱ्याचे मोहन घातलेले पीठ व बटाट्याच्या किसाचे पीठ एकत्र मळून घ्यावे. त्याच्या पुऱ्या लाटून घ्याव्यात. कढईत मध्यम आचेवर तूप तापवावे व त्यात पुऱ्या तळून घ्याव्यात. पुऱ्या तळल्यानंतर चाळणीत उभ्या करून ठेवाव्यात, जेणेकरून अधिकचे तूप निघून जाईल. या पुऱ्या गरमच खाण्यास द्याव्यात.
मखमली कोफ्ता करी
साहित्य
दोन उकडलेले बटाटे, ४ चमचे मिल्क पावडर, २ चमचे कॉर्नफ्लोअर, प्रत्येकी अर्धा चमचा जाडसर वाटलेली बडिशेप, धने व जिरे, चवीनुसार लाल तिखट व मीठ, १ बारीक चिरलेला टोमॅटो, १ बारीक चिरून भाजलेला कांदा, अर्धी वाटी कोथिंबीर, प्रत्येकी पाव वाटी भिजवलेले काजू, ओला नारळ व खवा, गरजेनुसार तेल.
कृती
प्रथम उकडलेले बटाटे कुस्करून घ्यावेत. मग त्यात मिल्क पावडर, कॉर्नफ्लोअर, बडिशेप, धने, जिरे व दोन चमचे लाल तिखट घालावे व मिश्रण छान एकजीव करून घ्यावे. या मिश्रणाचे लांबट आकाराचे किंवा गोलसर कोफ्ते तयार करावेत. कढईत तेल गरम करून त्यात कोफ्ते गुलाबी रंगावर तळून घ्यावेत. आता मिक्सरच्या भांड्यात टोमॅटो, कांदा, कोथिंबीर, काजू, ओला नारळ घेऊन मिश्रण एकत्र वाटून घ्यावे. कढईत तेल घालून त्यात हे वाटण छान परतून घ्यावे. या ग्रेव्हीमध्ये खवा घालून परतून घ्यावा. मग आवडीनुसार लाल तिखट घालावे व पुरेसे पाणी व मीठ घालून एक ते दोन उकळ्या काढाव्यात. सर्व्हिंग बाऊलमध्ये कोफ्ते घेऊन त्यावर ग्रेव्ही घालावी. ही कोफ्ता ग्रेव्ही पोळी, पुरी किंवा भाताबरोबर सर्व्ह करावी.