

Re release movies
esakal
आजकाल सोशल मीडियावर रिल्समधून नॉस्टॅल्जिया होलसेलमध्ये वाटला जातो, पण तो इतर कोणाकडून उसना न घेता फर्स्ट हँड अनुभवायचा असेल, तर तशी सोय आता सहज उपलब्ध झाली आहे, ती म्हणजे प्रत्येकाला आपापल्या लाडक्या काळात घेऊन जाणारे पुनर्प्रदर्शित चित्रपट!
‘पू रबसे सूर्य उगा, फैलाह उजियारा, जागी हर दिशा दिशा, जागा जग सारा’ भटियार रागातल्या या दोन ओळी एक दिवस अचानक कानावर आल्या. रोज सकाळी ऑफिसला जाताना गाडीत बसल्यावर एखादं पॉडकास्ट किंवा कोणाची तरी मुलाखत ऐकण्याचा माझा शिरस्ता आहे, पण एखाददिवशी ऑफिसमध्ये खूप महत्त्वाचं काहीतरी काम असेल, तर तो दिवस खास असतो! मग त्या दिवशी ऑफिसला पोहोचेपर्यंत एखादा राग निवडून त्यातली बंदिश, ख्याल किंवा त्या रागामध्ये बांधलेलं काहीतरी ऐकायचं हे आता कायमचं ठरलं आहे. आपल्या रोजच्या धावपळीत असा एखादा दिवस असतो, जो उठल्यापासून ‘आपला’ असतो! सकाळची कॉफी परफेक्ट स्ट्राँग होते, ऑफिसला जाताना रस्त्यात सगळे हिरवे सिग्नल लागतात, घड्याळाच्या काट्याबरोबर आपण एकदम सिंकमध्ये असतो, कोणत्या रस्त्याला कमी ट्रॅफिक असेल याबद्दलचा आपला अंदाज मॅप्सला डावलूनही बरोबर येतो, असे आणि यासारखेच अगदी बारीकसारीक निर्णय आणि निवडी, अतिशय करेक्ट केल्या जातात! तो दिवस त्यातला असावा, म्हणूनच कदाचित त्या दिवशी मी भटियार निवडला! कोणाची चीज ऐकावी विचारच करत होते, तोपर्यंत या रागात बांधलेल्या सगळ्या गोष्टी यूट्यूब सुचवू लागलं आणि समोर दिसली ही ‘राष्ट्रीय साक्षरता मिशन’ची जाहिरात! कविता कृष्णमूर्तीचा निकोप, सूर्यप्रकाशासारखा लखलखता, तेजाळ आवाज! थंडीची सकाळ, शाल पांघरून फिरायला निघालेले आजोबा आणि अक्षरं पेंट करणारा पिवळ्या टी-शर्टमधला मुलगा! उणीपुरी एखाद्या मिनिटाची जाहिरात, पण मला ती थेट लहानपणात घेऊन गेली, त्यातले आजोबा कसा दाढीचा फेस त्या मुलाच्या गालाला लावतात, तसा मीही हट्ट करून बाबांकडून लावून घेतल्याचं आठवलं; दुसऱ्या ओळीतले तेजस्वी वरचे सूर ऐकून सर्रकन अंगावर काटा आला. आणि कितीतरी वर्षांनी मी नॉस्टॅल्जिया अनुभवला! आनंद, राग, दुःख, भीती वगैरे नऊ प्रमुख सर्वमान्य ढोबळ भावनांमध्ये आणखी एका अंडररेटेड इमोशनची गणना व्हायला हवी असं माझं मतच नाही तर आग्रह आहे, ती भावना म्हणजे ‘नॉस्टॅल्जिया’!