
डॉ. आशुतोष जावडेकर
जगताना जर कधी उमेद खचली, कधी निराश व्हायला झालं तर क्रीडा आणि विनोद या दोन्हीइतकं दुसरं चांगलं औषध नाही! खेळ सगळ्यांना आवडतात, पण वाढत्या वयानुसार आपण खेळ खेळत नाही तर बघतो. अनेकदा आपण नुकत्याच झालेल्या क्रिकेटच्या मॅचवर जोरदार गप्पा मारतो, वाद घालतो. समोर कितीही चांगला खेळ सुरू असला, तरी कॉमेंटेटर आपल्या शब्दांनी त्याला अधिक जिवंत करतो हाही आपला अनुभव असतो. थोडक्यात काय, क्रीडा आणि शब्द या दोन गोष्टी वाटतात तितक्या दूर नसतात. खेळाचा अनुभव जितका उत्कट, तितका तो शब्दांमधून व्यक्त करण्याची तहान अधिक असते. आणि म्हणून जगभरच्या भाषांमध्ये क्रीडाप्रकारांवर लिहिलं गेलं आहे. इंग्रजीत तर अक्षरशः हजारो पुस्तकं आहेत. खेळ आणि खेळाडू यांची दुनिया मांडणारी ही पुस्तकं भाषेसाठीही वेगळा खेळ मांडून देतात असं म्हणायला पाहिजे!