

Senior citizen lifestyle and mental health
esakal
मला कोणाचं तरी एक बोधवाक्य आठवत होतं. त्या वाक्याचा सारांश असा, की तुमच्या शारीरिक वयाची बंधनं तुमच्यावर घालून घेऊ नका. समाजाच्या अपेक्षा आणि साचेबद्ध आयुष्याच्या कल्पनांची बंधनं टाका तोडून. मुक्त व्हा त्यातून आणि तुमची वाट निर्माण करा. स्वतःच्या कल्पनेतलं आयुष्य जगण्याचं धाडसी पाऊल त्या वाटेवर टाका! आणि मग त्या वाटेवरून जाताना ‘माइल्स टू गो बिफोर आय स्लीप’ असा मार्चिंग बँड मनात वाजला, तर नवल नाही.
पुण्यातली एक सकाळ. एका उपाहारगृहात नूतन मराठी विद्यालय म्हणजे ‘नूमवी’ची तीस-चाळीस मुले वयाला साजेसा दंगा करत बसलेली. वेळेची घंटा वाजण्याआधीच मी आणि संयोजक तिथे डोकावलो. ‘बाई आल्या’चा एक क्षणभर दबदबा! पुढच्याच क्षणी मीसुद्धा त्या दंग्यात सामील झाले. गरम कॉफीचे कप हातात घेऊन आम्ही सगळेच थोडा वेळ गप्पांत रंगलो. कार्यक्रमाची वेळ झाल्याचे कोणीतरी सांगितले, सगळे आपापल्या शिस्तीत जागेवर बसले. ‘प्रमुख पाहुणी’ म्हणून मीही माझी जागा घेतली.