

Mig-21 Supersonic Drone Conversion
esakal
भारतीय हवाई दलातून निवृत्त झालेल्या मिग-२१ लढाऊ विमानांचे पुढे काय होणार? ती भंगारात दिली जाणार का? भारतीय हवाई दल आणि संरक्षण मंत्रालयापुढे काय पर्याय आहेत? चीनने एक भन्नाट प्रयोग करून खरेच जगापुढे आदर्श निर्माण केला आहे का? भारतही त्याचा अवलंब करू शकतो का? आढावा...
भारतीय हवाई दलाच्या सेवेत तब्बल सहा दशके सेवा करणाऱ्या मिग-२१ या लढाऊ विमानांना दोनेक महिन्यांपूर्वी सन्मानपूर्वक निरोप देण्यात आला. हवाई दल प्रमुखांच्या उपस्थितीत चंडीगढ येथे या विमानांना सॅल्यूट करण्यात आला. भारतीय संरक्षण उत्पादन क्षेत्राची पायाभरणी करणाऱ्या आणि ६०च्या दशकात भारतात आत्मनिर्भरतेचे अंकुर पेरणाऱ्या मिग-२१ या लढाऊ विमानांनी मोठा इतिहास घडविला आहे. भारताच्याच नाही तर जगाच्या संरक्षण क्षेत्रात मानाचे पान ठरावी अशी मिग-२१ लढाऊ विमानांची कारकीर्द आहे. रशियन बनावटीची ही विमाने भारतासह अनेक देशांनी स्वीकारली आणि त्याद्वारे आपल्या देशाची सुरक्षा अबाधित ठेवली. भारतीय हवाई दलातून सन्मानपूर्वक निरोप दिलेल्या मिग-२१ विमानांचे पुढे काय होणार? खरेतर त्यांचे काय करायला हवे? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. भारतीय हवाई दलाकडे जवळपास ४०च्या आसपास मिग-२१ विमाने आहेत. या विमानांच्या पुढील वाटचालीबाबत हवाई दलाकडे किंवा संरक्षण विभागाकडे काय पर्याय आहेत, याचा विचार करायला हवा.