नितीन थोरात
क्षत्रियकुळावंत साधू ही माझी कादंबरी ३७६ पानांची असली, तरी प्रत्यक्षात मी दोन हजार पाने लिहिली होती. सलग साडेसहाशे दिवस अभ्यास आणि काम केल्यावर कादंबरी वास्तवात उतरली! गेल्या वर्षी गुढीपाडव्याला प्रकाशित झालेली ही कादंबरी सलग सहा दिवस ॲमेझॉनवर बेस्टसेलरचा किताब मिरवत होती. साधू कादंबरीच्या प्रवासावरच एखादी कादंबरी लिहिता येईल असा हा अनुभव होता!
कादंबरी लेखन म्हणजे तपस्याच. ती भंग होत नाही, तोवर आपण वर्तमानात नसतोच. आजवर बरेचदा याचा अनुभव आलाय. पण साधू लिहिताना अनेक अर्थाने या तपस्याभंगाचं दुःख झालं. क्षत्रियकुळावंत साधू कादंबरी लिहायला दोन वर्षे लागली. सलग दोन वर्षे माझी तपस्या सुरू होती. मी शरीरानं माणसांमध्ये असायचो, पण मनानं शिवाजी महाराजांसोबत असायचो; साडेतिनशे वर्षे मागे! सलग दोन वर्षे मी खरोखरच १६६६च्या काळात घालवली आहेत.