Philosophical analysis of human nature as the root cause of war
Esakal
विश्वाचे आर्त । डॉ. सदानंद मोरे
वसाहतींमधील असंस्कृत अडाण्यांना आधी मनुष्य व नंतर सुसंस्कृत मनुष्य करणे हा आपल्या कर्तव्याचा भाग असल्याचे वाटल्यास आश्चर्य नाही. त्यामुळे लष्करी, आर्थिक, वैज्ञानिक - तंत्रवैज्ञानिक प्रभुत्वाबरोबर धार्मिक प्रभुत्वाचा मुद्दाही गुपचूप शिरकाव करीत होता. या सर्वांचे रूपांतर राजकीय वर्चस्वात जोपर्यंत होत नाही तोपर्यंत ही मंडळी स्वस्थ बसणार नव्हतीच! सर्वंकष प्रभुत्वाकडील ही वाटचाल होती.
जगाच्या इतिहासामधील कालखंडांचे वर्गीकरण करताना, ते युद्धाचा कालखंड आणि शांततेचा कालखंड या दोघांमध्ये करावे लागेल असे एक मत असते. त्यावर प्रतिक्रिया देताना, अर्थातच ते खोडून काढताना एका विचारवंताने युद्धाचा कालखंड आणि युद्धाच्या तयारीचा कालखंड असा पर्यायही सुचवला.
याला विनोद म्हणा किंवा अतिशयोक्ती म्हणा, शांतता नको आणि युद्ध हवे असे म्हणणारा कोणी सापडेल असे वाटत नाही; पण तरीही प्रत्यक्ष व्यवहारात मात्र युद्धे अपरिहार्य ठरली आहेत. युद्धाची कारणे जशी बाह्य (म्हणजे संपत्ती, भूमी) अशी सांगितली जातात, तशीच ती अंतरिकही असू शकतात. खरेतर युद्धाची प्रवृत्ती हा मानवी स्वभावाचा भाग आहे, असेही म्हणता येईल. त्याचेही मूळ शोधले तर स्वामित्वाची, मालकी हक्काची भावना, असेही एक उत्तर येऊ शकते. परिग्रह किंवा हव्यास किंवा लालसा, लोभ या संकल्पनाही उपयुक्त ठरतील आणि त्याच्याही मागे जाऊन अनिश्चिततेची व असुरक्षिततेची जाणीवही पुढे करता येईल.
युद्ध होऊच नये अशी टोकाची भूमिका घेणारे विचारवंतही होतेच. अलीकडच्या काळातील बर्ट्रांड रसेल या ब्रिटिश तत्त्वज्ञाचे नाव या संदर्भात अग्रक्रमाने घ्यावे लागते. स्वतः गौतम बुद्धाने राज्यत्याग करून वनाचा रस्ता धरला याचे कारण त्याला त्याच्या स्वतःचा शाक्य गण आणि कोलीय गण यांच्यामधील युद्ध पसंत नव्हते, असेही सांगण्यात येते. युद्ध थांबवणे त्याला शक्य नव्हते; पण गणप्रथेप्रमाणे युद्धात उतरणेही पटत नव्हते. म्हणून त्याने गृहत्याग केला, असे एक मत प्रचलित आहे. त्यामुळे ‘युद्ध नको बुद्ध हवा’ हा केवळ शाब्दिक खेळ नसून त्याला काही आधार असल्याचे म्हणता येईल.