

Senecio Plant and Pollination
esakal
डॉ. मंदार दातार
नवरात्रीच्या सुमारास सह्याद्रीच्या कोणत्याही उताराजवळ उभं राहा. खाली दरीत सरत्या पावसाळ्याच्या धुक्याचे अवशेष असतील, समोर शरदातलं निळं आकाश असेल आणि आजूबाजूला सोनकीचा पिवळा गालिचा... सह्याद्रीत मानवाचं अस्तित्व नव्हतं, तेव्हाही सोनकी फुलत होती; कदाचित आपलं अस्तित्व नष्ट झालं, तरीही सोनकी फुलत राहील.
ऑक्टोबरात शरद आपल्या परमोच्च बहरात असतो, तेव्हा नवरात्रीच्या दरम्यान सह्याद्रीमध्ये फार अप्रतिम दृश्य दिसतं. डोक्यावर निळं आकाश आणि उतारांवर, पठारांवर, किल्ल्यांच्या तटांवर सगळीकडे पिवळ्या-सोनेरी रंगाचा गालिचा. जणू आसपास कुणीतरी सोनं पेरून ठेवलंय असं वाटतं. हे सोनं उधळलेलं असतं सोनकी नावाच्या वनस्पतीनं. शरदाच्या रात्री रुपेरी चांदण्यांत शीतलतेची बरसात करत असतात, तेव्हा दिवस मात्र सोनकीनं सोनसळी केलेले असतात. साधारण गुडघ्याएवढ्या उंचीच्या या वनस्पतीची पानं हिरवी असतात, मात्र पानांची खालची बाजू शरदाचं प्रतिबिंब असल्यासारखी चंदेरी-पांढरी असते. भाद्रपद सरता सरता आश्विनात या वनस्पतीच्या शेंड्यावर सोनेरी फुलांचे गुच्छ येतात आणि सह्याद्रीत सोनकीचा ‘समा’ बांधला जातो.