Salvador Dali : विलक्षण कल्पनाशक्ती लाभलेला प्रतिभावान चित्रकार..

प्रतिभावान पण विक्षिप्त साल्वादोर दाली
Salvador Dalí
Spanish artist
Salvador Dalí Spanish artist esakal

डॉ. सुहास भास्कर जोशी

विलक्षण कल्पनाशक्ती लाभलेला प्रतिभावान चित्रकार आणि फोटोग्राफीक वास्तववादी शैलीत काम करणारा कुशल कारागीर असणाऱ्या दालीची प्रतिमा ही मूलतः धक्कादायक आणि विचित्र अशी सररियालिस्ट पेंटिंग रंगवणारा कलावंत अशीच आहे.

‘दररोज सकाळी मी जागा होतो, ते एका विलक्षण आनंदाच्या उर्मीने. आणि तो आनंद असतो साल्वादोर दाली असण्याचा. मला तर दररोज असाही प्रश्न पडतो की साल्वादोर दाली नसताना माणसं आनंदानं जगू कशी शकतात?’

बऱ्याच वर्षांपूर्वी इंटरनेटवर मी पहिल्यांदा हे वाक्य वाचलं, तेव्हा मी थक्कच झालो होतो. साल्वादोर दाली– एक महान प्रतिभावंत कलाकार. विक्षिप्त. कलंदर. रसिक. रंगेल. आणि अफाट श्रीमंत. मला व्हॅन गॉग, पॉल गोगँ, तुळूज लोत्रेक अशा अनेक श्रेष्ठ चित्रकारांचं भणंग, भकास आणि भरकटलेलं आयुष्य ठाऊक होतं. त्या पार्श्वभूमीवर हे व्यक्तिमत्त्व भलतंच वेगळं वाटलं होतं. साल्वादोर दाली नेहमी म्हणायचा, “या विसाव्या शतकातील खरे प्रतिभावंत दोनच – पहिला पिकासो आणि दुसरा मी!” दाली हा विसाव्या शतकातील महान प्रतिभावंत सररियालिस्ट चित्रकार होता हे मान्य केलं, तरी स्वत:वर इतका खूश असणारा ‘नार्सिसिस्ट’ कलाकार माझ्या पाहण्यात नव्हता.

त्यात मी प्रथमच पाहिलेल्या त्याच्या छायाचित्रानं माझ्यावर जे गारुड केलं होतं, त्याची मोहिनी तर अजून उतरलेली नाही. गोरा वर्ण, तरतरीत नाक, विशाल कपाळ, मागं वळवलेले लांब केस... पण या सगळ्यांपेक्षा नजरेत भरत होते ते त्याचे वटारल्यासारखे वाटणारे विस्फारलेले उग्र डोळे आणि टोकदार वर वळवलेल्या मिशा. (“या वर वळवलेल्या मिशा म्हणजे माझ्या ‘अॅन्टिना’ आहेत. त्यातनं मला नवनवीन कल्पना प्राप्त होतात!” असं दाली कायम म्हणायचा.)

प्रथमदर्शनात समोरच्या व्यक्तीवर छाप पाडणाऱ्या साल्वादोर दालीने त्याच्या एकापेक्षा एक सरस चित्रकृतींनी कलेच्या इतिहासात आपली अमिट मुद्रा तर उमटवलीच, पण आपल्या विक्षिप्त-विचित्र वागण्या-बोलण्याने स्वत:ला नेहमीच चर्चेचा विषयही बनवलं.

जलरंग-तैलरंगातील चित्रकला, शिल्पकला, जाहिरातकला, छायाचित्रकला, फॅशन डिझायनिंग, चित्रपट कथालेखन, नाटकांसाठी नेपथ्य, आर्किटेक्चर आणि लेखन अशी असंख्य क्षेत्रातील ‘जिनियस’ म्हणजे प्रतिभावंत या शब्दाला सार्थ ठरवणारी कामगिरी करणारा दाली हा जागतिक कलाविश्वावर जबरदस्त प्रभाव पडणारा मोठा कलाकार होता, यात शंका नाही.

तैलरंगातील १,०२९ चित्रं, जलरंगातील १२८ चित्रं, ३४९ रेखाटनं आणि ७३ शिल्पं व इतर वस्तू अशी प्रचंड कामगिरी करणाऱ्या दालीचं हे अफाट कर्तृत्व पाहिलं की डोळे दिपून जातात. ‘मी म्हणजेच सररियालीझम!’ असं म्हणणाऱ्या दालीच्या विलक्षण सररियालिस्ट चित्रकृतींनी चित्ररसिकांना वरचेवर धक्के दिले.

त्याची ‘वाळत टाकलेली घड्याळे’ ही सररियालिस्ट चित्रकृती जगातील सर्वात प्रसिद्ध दहा चित्रकृतींपैकी एक समजली जाते.

मात्र अशा जबरदस्त चित्रकर्तृत्वाच्या जोडीला विक्षिप्त वागण्या-बोलण्यामुळेदेखील दाली कायम चर्चेचा विषय असायचा. १९३४ साली अमेरिका भेटीतील त्याच्या चित्रप्रदर्शनाच्या उद्‌घाटन प्रसंगी दालीनं छातीवर ब्रेसियर असलेली काचेची पेटी घालून प्रवेश केला होता.

तर १९३६ साली लंडन येथे त्याच्या भाषणाच्या कार्यक्रमाच्यावेळी दाली दोन शिकारी कुत्र्यांना घेऊन पाणबुड्याच्या पोशाखात आला होता. कधी तो सोनेरी रंगाच्या अवकाशयात्रीच्या पोशाखात पारदर्शक काचेच्या फुग्यासारख्या वाहनातून कार्यक्रमाला यायचा, तर कधी पांढऱ्याशुभ्र रोल्सराईसमध्ये शेकडो कोबीचे गड्डे घेऊन जायचा.

व्हेनिसमधील एका कार्यक्रमाला तो आणि त्याची बायको गाला १८ फूट उंच राक्षसाच्या पोशाखात आले होते, तर पॅरिसमधील एका भाषणापूर्वी ती दोघं १५ यार्ड लांब ब्रेड रस्त्यातून मिरवणुकीनं घेऊन आले. रोममधील एका कार्यक्रमात दाली एका चौकोनी खोक्यातून येऊन त्यावरचं कागदी कवच फोडून (अंड्यातून) जन्म घेतल्याप्रमाणे बाहेर आला.

बऱ्याच ठिकाणी तो त्याचा लाडका बोका ‘बाबो’ला घेऊन जायचा. बोलताना तो बऱ्याचदा इंग्रजी, स्पॅनिश, फ्रेंच आणि कॅटलोनीयन भाषांतील शब्दांचं मिश्रण करून, तर कधी नव्यानं निर्माण केलेल्या शब्दांचा वापर करून बोलायचा.

बाकी दालीची वक्तव्यं त्याच्या वागण्याइतकीच प्रसिद्ध व्हायची. दाली नेहमी म्हणायचा, “लोकांचा तुमच्यातील रस अर्धा तास टिकवणं अवघड असतं.

पण मी मात्र गेली अनेक वर्षं चोवीस तास हेच करतोय!” यावरही त्याची मल्लिनाथी असायची, तो म्हणायचा, “कधीतरी माझ्या (असल्या विक्षिप्त) वागण्यामुळं लोकांना माझ्या चित्रकलेत रस निर्माण होईल!” असा हा साल्वादोर दाली. त्याचं आयुष्यही तितकंच वेधक होतं.

Salvador Dalí
Spanish artist
J.J. School Of Arts : राज ठाकरे ते एम एफ हुसेन, जे जे स्कूल ऑफ आर्टच्या विद्यार्थ्यांनी जग गाजवलंय

साल्वादोर डॉमिंगो फिलिप जेसिंटो दाली इ डॉमिनेक (Salvador Dali, 1904-1989) असं भरभक्कम नाव धारण करणाऱ्या दालीचा जन्म स्पेनमधील फिग्युरेस या गावी ११ मे १९०४ या दिवशी झाला. वकील असणाऱ्या मध्यमवर्गीय, कडक शिस्तीच्या भोक्त्या त्याच्या वडिलांना आपल्या मुलानंही वकील व्हावं असं वाटत होतं.

आईनं मात्र कायम मुलाचा कल ओळखून चित्रं काढण्यास प्रोत्साहन दिलं. वयाच्या सहाव्या वर्षी दालीनं त्याचं पहिलं तैलरंगातील निसर्गचित्र रंगवलं. तर तो पंधरा वर्षांचा असताना म्हणजे १९१९ साली त्याच्या चित्रांचं पहिलं जाहीर प्रदर्शन भरलं.

माद्रिद येथील ड्रॉइंग स्कूलमध्ये दाली हा हुशार विद्यार्थी म्हणून गणला जात असला तरी त्याचं वागणं तेव्हाही दिखाऊपणाचं आणि विक्षिप्तपणाचं असायचं. पिकासोचा भक्त असणाऱ्या दालीने सुरुवातीच्या काळात क्युबिस्ट शैलीत काही चित्रं केली.

१९२९ साली लुई ब्यूनेल या सररियालिस्ट सिनेदिग्दर्शकाबरोबर दालीनं अन चिन अंडालो या मूकपटासाठी संहितालेखन केलं. याच काळात कवी आंद्रे ब्रेटॉन या सररियालिस्ट चळवळीच्या संस्थापकाशी दालीची चर्चा झाली.

‘सररियालीझम’ (Surrealism) म्हणजे तार्किक कार्यकारणभावाला फाटा देऊन माणसाच्या स्वप्नात आणि अबोध मनात प्रकट होणाऱ्या प्रतिमांचं आणि विचारांचं मुक्त प्रकटीकरण. सिग्मंड फ्रॉईड या मानसशास्त्रज्ञाच्या ‘स्वप्नांचा अर्थ’ या संकल्पनेचा प्रभाव आंद्रे ब्रेटॉन तसेच सररियालिस्ट कवी पॉल एल्युअर्ड, चित्रकार मॅक्स अर्न्स्ट या मंडळींवरपण पडला होता.

ब्रेटॉनशी भेट झाल्यावर मनातल्या चित्रविचित्र कल्पना कॅनव्हासवर उतरविण्याच्या विचारांनी झपाटलेला दाली घरी आला. आणि १९२९ साली डिसमल स्पोर्ट (Dismal Sport) हे पहिलं सररियालिस्टपेंटिंग त्यानं रंगवलं.

त्याच्या मनातल्या अनेक दडपलेल्या गोष्टी -विशेषतः लहानपणापासून त्याच्या मनात दडलेली नाकतोड्याची भीती तसेच लैंगिक भयगंड या चित्रात व्यक्त झाले होते. या काळात पॉल एल्युअर्ड आणि त्याची पत्नी गाला दालीला भेटायला आले. दाली दहा वर्षांनी मोठ्या गालाच्या प्रेमात पडला. एल्युअर्डच्या मृत्यूनंतर १९३४ साली दालीने गालाशी विवाह केला. आणि आयुष्यभर निष्ठेने गालावर भक्तीसदृश प्रेम केले.

गाला त्याची केवळ पत्नीच नव्हे तर त्याची मॉडेल, स्फूर्तीदेवता आणि आर्थिक व्यवहार सांभाळणारी व्यवस्थापकदेखील होती. विवाहानंतर दालीच्या कलाकारकिर्दीला- विशेषतः सररियालिस्ट पेंटिंग्जना बहर आला.

Salvador Dalí
Spanish artist
Ban On Pakistani Artistes: "इतक्या कोत्या मनाचं असू नये"; पाकिस्तानी कलाकारांवर बंदीच्या याचिकेवरुन सुप्रीम कोर्टानं फटकारलं!

विलक्षण कल्पनाशक्ती लाभलेला प्रतिभावान चित्रकार आणि फोटोग्राफीक वास्तववादी शैलीत काम करणारा कुशल कारागीर असणाऱ्या दालीची प्रतिमा ही मूलतः धक्कादायक आणि विचित्र अशी सररियालिस्ट पेंटिंग रंगवणारा कलावंत अशीच आहे.

त्याच्या या पेंटिंग्जमध्ये एखाद्या दु:स्वप्नात दिसाव्यात तशा चित्रविचित्र प्रतिमा फोटोग्राफीक शैलीत रंगवलेल्या दिसतात. १९३१ साली काढलेलं ९१/२ सेंटिमीटर बाय १३ सेंटिमीटर इतक्या छोट्या आकाराचं द पार्सिस्टन्स ऑफ मेमरी (The Persistence of Memory) हे सुप्रसिद्ध चित्र सध्या न्यू यॉर्कच्या म्युझियम ऑफ मॉडर्न आर्टमध्ये आहे.

या तैलचित्रामध्ये समुद्रकिनाऱ्यावर वाळत टाकलेली आणि वितळलेली घड्याळं, मोठ्या पापण्या असलेला डोळा मिटलेला पुरुषी चेहरा आणि घड्याळांवर काळ्या मुंग्या दिसतात. यातील मुंग्या पुरुषाच्या मनातील कामप्रेरणेचं तर वितळलेली, ओघळलेली घड्याळं त्याच्या मनातील नपुंसकतेच्या भीतीचं प्रतीक आहेत.

१९३६ साली काढलेल्या द सिटी ऑफ ड्रॉवर्स (The City of Drawers) या १० सेंटिमीटर बाय १५ सेंटिमीटर आकाराच्या चित्रात माणसाच्या धडाला कपाटाप्रमाणे अनेक कप्पे दाखवले आहेत. याचं स्पष्टीकरण करताना दालीनं एके ठिकाणी म्हटलं होतं, “आपण प्रत्येक जण असंतुष्ट असतो आणि त्याची उणीव आत्मपूजनानं भरून काढत असतो.

माणसांनी आत्मप्रौढीच्या अनेक जिनसा या कपाटाच्या कप्प्यांमध्ये भरलेल्या असतात.” १९३७ साली काढलेलं द मेटामॉर्फोसिस ऑफ नार्सिसस (The Metamorphosis of Narcissus) हे २० सेंटिमीटर बाय ३१ सेंटिमीटर या आकाराचं दालीचं आणखी एक प्रसिद्ध सररियालिस्ट पेंटिंग आहे.

यामध्ये ग्रीक पुराणातील स्वत:च्याच प्रेमात पडलेल्या आणि ईश्वरी इच्छेनुसार फुलामध्ये रूपांतर झालेल्या नार्सिससचे चित्रण केले आहे. या चित्रांशिवाय दालीने द ग्रेट मास्टरबेटर्स, द टेम्प्टेशन ऑफ सेंट अँथनी, फेस ऑफ वॉर, ड्रीम कॉज्ड बाय फ्लाइट ऑफ बी अशी अनेक धक्कादायक सररियालिस्ट चित्रं काढली.

आंद्रे ब्रेटॉनने या चित्रातील प्रतिमा पाहून म्हटले, “दालीच्या माध्यमातून आपल्या मनाच्या सर्व खिडक्या उघडल्या जात आहेत.” जगभर दालीच्या चित्रांची प्रदर्शनं व्हायला लागली. विलक्षण वेगानं दालीला पैसा आणि प्रसिद्धी मिळायला लागली.

Salvador Dalí
Spanish artist
Art Day : चिंता, हुरहूर, अस्वस्थता.... सर्व मानसिक आजार दूर करते आर्ट थेरपी

१९४० नंतर दालीने चित्रकलेशिवाय अनेक क्षेत्रात मुशाफिरी सुरू केली. एडवर्ड जेम्ससाठी त्याने लॉबस्टरच्या आकाराचा फोन तर केलाच, पण फेस ऑफ मे वेस्ट ही वैशिष्ट्यपूर्ण रचना असलेल्या खोलीची निर्मिती केली.

इंग्लंडमधील ‘ब्रायन अॅण्ड होव’ या म्युझियममध्ये असणाऱ्या या खोलीची रचना अशी आहे, की लांबून बघणाऱ्याला पडदे (चेहऱ्याच्या दोन बाजूंचे केस), दोन पेंटिंग्जच्या फ्रेम्स (दोन डोळे), उभट टिपॉय (नाक) आणि ओठांच्या आकाराचा सोफा या सगळ्यांमधून मे वेस्ट (Mae West) या अभिनेत्रीच्या चेहऱ्याचा भास होतो.

दालीने फॅशन आणि फोटोग्राफी या क्षेत्रातही आपला ठसा उमटवला. इटालियन फॅशन डिझायनर शियापरेली हिच्यासाठी त्याने लॉबस्टरची प्रिंट असणारा पांढरा पोशाख, बुटाच्या आकाराची हॅट, बक्कलच्या जागी ओठ असणारा कमरेचा पट्टा अशा वस्तू डिझाईन करून दिल्या. त्याने सेसिल ब्रेटॉन, फिलिप हॅल्समन यांसारख्या अनेक प्रख्यात फोटोग्राफरांबरोबर संयुक्तपणे काम केलं.

हॅल्समनबरोबर १९४८ साली केलेल्या दाली अॅटोमिका या छायाचित्र मालिकेत त्याने तंत्रकौशल्यानं चित्रकाराचं इझेल, खुर्ची, तीन मांजरं, पाणी भरलेली बादली आणि तो स्वत: असे हवेत तरंगताना दाखवले होते.

याच काळात दालीनं हिडन फेसेस नावाची कादंबरी तर लिहिलीच, पण त्याशिवाय द सिक्रेट लाइफ ऑफ साल्वादोर दाली, द डायरी ऑफ अ जिनियस, मॅनिअॅक आयबॉल्स, दाली बाय दाली ही आत्मचरित्रात्मक पुस्तकं लिहिली.

आधी उल्लेख केल्याप्रमाणे अन चिन अंडालो या चित्रपटाची आणि ल एज दिओर, मून टाइड या चित्रपटांच्याही पटकथा लिहिल्या. हिचकॉकच्या स्पेलबाउंड या रहस्यपटासाठी त्याने चित्रप्रतिमा रेखाटल्या. बॅचनेल, मारियाना पिनेदा, लिब्रींथ अशा अनेक नाटकांसाठी त्यानं नेपथ्य रंगवलं.

दालीला अमाप प्रसिद्धी आणि अफाट पैसा तर मिळत होताच, पण दाली जिवंतपणीच एक दंतकथा झाला होता. मात्र १९८० साली दालीच्या प्रकृतीनं विचित्र वळण घेतलं. वृद्ध गालानं दालीला अयोग्य औषधाचे डोस दिले.

परिणामी दालीच्या उजव्या हातातलं त्राण गेलं. वयाच्या ८७व्या वर्षी वृद्धापकाळानं गाला मरण पावली आणि दालीचा जगण्यातील रसच गेला. त्यानं अन्नपाणी वर्ज्य केलं. २३ जानेवारी,१९८९ रोजी फिग्युरेस इथं वयाच्या ८४व्या वर्षी दालीचा त्याची आवडती संगीताची रेकॉर्ड ऐकताना हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानं मृत्यू झाला.

शेवटी आणखी एक. श्रेष्ठ प्रतिभावान कलाकार दालीच्या कारकिर्दीचं, त्याच्या चित्रप्रक्रियेमागच्या विचारमंथनाचं आणि विक्षिप्तपणाच्या किश्श्यांचं वर्णन करणारं दालीचं आत्मचरित्रात्मक पुस्तक म्हणजे द डायरी ऑफ अ जिनियस.

केवळ दालीबाबत प्रेम असणाऱ्यानेच नव्हे, तर प्रतिभावंतांच्या मानसिकतेविषयी उत्सुकता असणाऱ्या प्रत्येक चित्ररसिकाने वाचावं असं हे पुस्तक. बाकी दालीनं स्वत:च या पुस्तकाविषयी लिहिलंय, ‘व्हॅन गॉगनं स्वत:चा कान कापून घेतला. तुम्ही तुमचा कान कापून घेण्यापूर्वी हे पुस्तक नक्की वाचा!’

-------------

Salvador Dalí
Spanish artist
Career Options for Arts Stream: कला शाखेचे विद्यार्थी या क्षेत्रात करू शकतात करिअर, दरमहा होईल लाखोंची कमाई

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com