संपादकीय
आज संपूर्ण जगात अशांततेचे वादळ घोंघावत आहे. राष्ट्र विरुद्ध राष्ट्र, धर्म विरुद्ध धर्म, एका विचारधारेविरुद्ध दुसरी विचारधारा असे संघर्ष रणांगणाबरोबरच माणसाच्या अंतरंगातही धगधगत आहेत. अशा अस्थिर आणि अशाश्वत काळात मार्गक्रमण करत असताना, विश्वशांतीचा संदेश देणारे संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचे अजरामर शब्द आजही जगाला दिशादर्शक ठरतात.
सर्व प्राणिमात्रांत परमात्म्याचे दर्शन करणारे, ‘विश्वाची माऊली’ म्हणून ओळखले जाणारे संतशिरोमणी ज्ञानेश्वर हे खऱ्या अर्थाने विश्वशांतीचे प्रणेते होते. यावर्षी १५ ऑगस्ट रोजी, गोकुळाष्टमीच्या पावन दिवशी, संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या सप्तशतकोत्तर सुवर्ण महोत्सवी जन्मोत्सवाच्या अपूर्व आनंदोत्सवाला संपूर्ण महाराष्ट्रभर सुरुवात होणार आहे.