

Sant Namdev Maharaj
esakal
डॉ. रवींद्र शोभणे
हिंदी संतकाव्याचे आद्य रचनाकार
संत नामदेव हे केवळ मराठीतीलच आद्य कवी ठरत नाहीत, तर ते हिंदी आणि गुरुमुखी (पंजाबी) भाषेतीलसुद्धा आद्य कवी आणि आद्य संत ठरतात. संत ज्ञानदेवांच्या आणि त्यांच्या भावंडांच्या समाधीनंतर ते काही काळ महाराष्ट्रात होते. या काळात इसवी सन १२७१ ते १३०९ या काळात रामदेवराय यादव राजांची सत्ता दक्षिणेत होती. देवगिरी ही त्यांची राजधानी होती. आपल्या राज्याचा विस्तार करण्यासाठी त्याने काही मोहिमा काढल्या. खानदेश, वऱ्हाड, मध्य प्रदेश इत्यादी प्रदेशांमधील राजांचा त्याने पराभव केला. पण पुढे त्याचे वर्चस्व टिकले नाही. दिल्लीला सुलतान म्हणून गादीवर असलेल्या अल्लाउद्दीन खिलजीच्या आदेशावरून मलिक काफूर याने इसवी सन १३०८मध्ये देवगिरीवर स्वारी करून रामदेवरायाला अटक केली आणि त्याची रवानगी दिल्लीला केली. पुढे इसवी सन १३१७च्या सुमारास मुबारक शाह खिलजीने यादवांचे राज्य खालसा केले आणि दक्षिणेतील वैभवशाली हिंदू साम्राज्याचा अस्त झाला. त्यापाठोपाठ दक्षिणेत मुस्लिमांची धार्मिक आक्रमणे सुरू झालीत. हिंदू संस्कृतीवर प्रचंड आघात व्हायला लागले. सामाजिक आणि धार्मिक परिस्थिती हळूहळू बदलू लागली. तरी वारकरी संप्रदायातील संत विठ्ठलावर आपली असीम श्रद्धा ठेवून भागवत धर्माचा प्रसार आणि प्रचार आपल्यापरीने करीत होतेच. संत ज्ञानेश्वरांच्या आणि त्यांच्या भावंडांच्या समाधीनंतर जवळजवळ तीस ते पस्तीस वर्षे संत नामदेव महाराष्ट्रात वावरत होते. या काळात त्यांनी आपल्या समृद्ध काव्यनिर्मितीबरोबरच कीर्तन परंपरा, भागवत धर्म यांची भक्कम पायाभरणी केली होती. धार्मिक आक्रमणांच्या काळातसुद्धा संत नामदेवांसह त्यांच्या काही शिष्यांनी आपल्या भागवत धर्मावर कोणतीही टाच येऊ दिली नाही. एकीकडे सर्वत्र यवनी सत्तेचा फास आवळला जात असताना वारकरी संप्रदाय आणि पंढरपूर यांचे रक्षण विधायक, श्रद्धापूर्ण मार्गाने करण्याचे कार्य सर्वसामान्य वारकरी करीत होता. त्यांना अप्रत्यक्ष मार्गदर्शन करण्याची जबाबदारी संत नामदेवांनी आपल्या खांद्यावर घेतली होती.