

Saudi Turkey Hejaz rail revival
esakal
अरविंद रेणापूरकर
सौदी अरेबिया सध्या तुर्किये आणि आखाती देशांना जोडणाऱ्या एका महत्त्वाकांक्षी आंतरराष्ट्रीय रेल्वे प्रकल्पावर काम करत आहे. हा रेल्वेमार्ग तुर्कीयेमधील इस्तंबूलपासून सुरू होऊन सीरिया आणि जॉर्डनमार्गे सौदी अरेबियात प्रवेश करणार आहे आणि पुढे तो ओमानपर्यंत जाण्याची शक्यता आहे. सध्या या प्रकल्पाचा व्यवहार्यता अभ्यास सुरू असून, तो या वर्षाअखेरीस पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. सध्या अस्थिर पश्चिम आशियातील स्थितीमुळे पुरवठा साखळी सक्षम करण्यासाठी विविध पर्यायांवर विचार केला जात असताना लांब पल्ल्यांचे रेल्वेमार्ग भविष्यात उद्भवणाऱ्या संकटावर काही प्रमाणात मार्ग काढू शकतात.
मोठ्या रेल्वे मार्गाच्या उभारणीसाठी पुढे सरसावले आहेत. हा प्रस्तावित मार्ग जेद्दा-मक्का-मदीना-जॉर्डन-सीरियामार्गे इस्तंबूलपर्यंत जाणार आहे. सौदीचे परिवहन मंत्री सालेह अल-जास्सेर यांनी सांगितले, की हा प्रकल्प प्रादेशिक एकात्मता वाढवेल, व्यापाराला चालना देईल आणि शाश्वत भू-वाहतूक व्यवस्था उभी करेल. सध्या सौदी अरेबियाने पूर्वेकडील बंदरांना जॉर्डन सीमेजवळील अल-हदीथा यांच्याशी जोडणारा लॉजिस्टिक्स कॉरिडॉर सुरू केला असून, भविष्यातील आंतरराष्ट्रीय जोडणीसाठी हा महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. या प्रकल्पाचा पहिला टप्पा तुर्किये-सीरिया-जॉर्डन रेल्वे मार्गाच्या आधुनिकीकरणावर केंद्रित आहे. त्यानंतर हा मार्ग दक्षिणेकडे वाढवून सौदीच्या रेल्वे नेटवर्कशी जोडला जाईल.
तुर्किये, जॉर्डन आणि सीरिया यांनी अम्मान येथे नुकत्याच वाहतूक सहकार्य करारावर स्वाक्षऱ्या केल्या असून, त्यामुळे रस्ते व रेल्वे कनेक्टिव्हिटीला चालना मिळणार आहे. हा प्रकल्प ऐतिहासिक हिजाज रेल्वेच्या संकल्पनेला पुनरुज्जीवित करणारा आहे. १९०० ते १९०८ दरम्यान ऑटोमन साम्राज्यातील सुलतान अब्दुल हमीद द्वितीय यांच्या काळात ही रेल्वे उभारली गेली होती. मूळ योजना इस्तंबूल ते मक्का जोडण्याची होती, मात्र पहिले महायुद्ध सुरू झाल्यामुळे ही रेल्वे केवळ मदीनापर्यंतच पोहोचू शकली. सध्या हा प्रकल्प अभ्यासाच्या टप्प्यात असून, बांधकामाची वेळापत्रके, निधी व्यवस्था आणि अंतिम मार्ग अद्याप निश्चित करण्यात आलेले नाहीत. तरीही, शतकानंतर पुन्हा एकदा या ऐतिहासिक मार्गाला आधुनिक रूप देण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. याशिवाय, सौदी अरेबियाची बंदरे आणि वाहतूक मार्ग एकत्रितपणे कार्यरत असून, प्रादेशिक व्यापार सुरळीत ठेवण्यासाठी आणि देशांदरम्यान मालवाहतुकीला गती देण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावत आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.
सध्याच्या काळात होर्मुझ सामुद्रधुनी परिसरातील तणावामुळे जागतिक पुरवठा साखळीवर परिणाम होत असताना, सौदी अरेबिया पर्यायी लॉजिस्टिक्स मार्ग विकसित करण्यावर भर देत आहे. यानुसार तांबडा समुद्र आणि आखात किनाऱ्यावरील पायाभूत सुविधांचा वापर करून नवीन मार्ग तयार करण्यात येत आहेत. रियाधने बंदरे आणि रेल्वे नेटवर्क जोडणारे ‘लॉजिस्टिक्स कॉरिडॉर’ आधीच सुरू केले आहेत. यामुळे गल्फ आणि रेड सीदरम्यान मालवाहतूक सुलभ झाली आहे. तसेच पश्चिम किनाऱ्यावरील बंदरांची क्षमता वाढवून वळवलेल्या मालवाहतुकीला हाताळण्याची तयारी केली जात आहे. यासोबतच, सुमारे ९५० किमी लांबीच्या जेद्दा-रियाध ‘सौदी लँडब्रिज प्रकल्पा’लाही पुन्हा गती देण्यात येत असून, तो देशातील सर्वात मोठ्या प्रलंबित वाहतूक प्रकल्पांपैकी एक आहे. एकेकाळी अरब द्वीपकल्प आणि लेव्हँट प्रदेशाला जोडणारा हा मार्ग आता बदलत्या जागतिक व्यापार परिस्थितीत पुन्हा महत्त्वाचा ठरत आहे. एकूणच, हे रेल्वे प्रकल्प आणि लॉजिस्टिक्स उपक्रम सौदी अरेबियाला प्रादेशिक व्यापार केंद्र म्हणून उभे करण्याच्या प्रयत्नांचा भाग आहेत, विशेषतः जागतिक पुरवठा साखळीवर भू-राजकीय जोखमींचा प्रभाव वाढत असताना.