पुरूषोत्तम बेडेकर
स्वप्नातले-स्वमालकीचे घरकूल बांधायचे असो किंवा जगप्रवासाची हौस पुरवायची असो... त्याला हवा भरपूर पैसा. आपल्या कष्टाचा पैसा फक्त साठवून उपयोग नाही, तर तो योग्य ठिकाणी गुंतवलाही पाहिजे. त्यासाठी हवं आर्थिक नियोजन आणि आर्थिक तज्ज्ञांची मदत. अर्थात बचत आणि गुंतवणूक यांच्यातील फरक ओळखून, त्यातून परतावा कसा, किती, कधी मिळेल याचाही विचार करायला हवा.
आपल्या जीवनातील प्रत्येक महत्त्वाच्या गोष्टीतील यशासाठी नियोजन आवश्यक असते. कारण आपल्या विविध ध्येयांच्या पूर्तीसाठी पुरेसे आर्थिक पाठबळ लागते. आपल्या सर्व उद्दिष्टांची पूर्ती निर्धारित वेळेप्रमाणे व्हायची असेल, तर योग्य आर्थिक नियोजनाला अनन्यसाधारण महत्त्व आहे.
आर्थिक नियोजनाचे बचत आणि गुंतवणूक हे दोन भक्कम खांब आहेत. हे दोन्ही शब्द समानार्थी वाटत असले, तरी त्यामध्ये खूप मोठा फरक आहे, आणि तो समजून घेणे आपल्यासाठी महत्त्वाचे आहे. योग्य सुरक्षा कवच निर्माण करण्यासाठी, तसेच तर्कसंगत आर्थिक निर्णय घेण्यासाठी हा फरक समजून घ्यायला हवा.